१५४८ बालके तीव्र कुपोषित; ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:32 AM2019-03-10T00:32:02+5:302019-03-10T00:32:26+5:30
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांगीण सक्षम असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात आजही सुमारे एक हजार ५४८ बालके तीव्र कमी वजनाची आढळली आहेत.
- सुरेश लोखंडे
ठाणे : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांगीण सक्षम असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात आजही सुमारे एक हजार ५४८ बालके तीव्र कमी वजनाची आढळली आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड झाले आहे.
कुपोषित बालकांमध्ये ७९ बालके तीव्र कुपोषित, तर ९७१ बालके मध्यम कुपोषित आहेत. याशिवाय १५९ बालके दुर्धर आजाराशी झगडत आहेत. याशिवाय एक हजार ५४८ बालके अति कमी वजनाची आढळून आली. त्यांच्यावर वेळीच दैनंदिन उपचारासह पोषण आहाराची मात्र न दिल्यास ते कुपोषणाच्या संख्येत वाढ करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या तीव्र कमी वजनाच्या बालकांच्या तुलनेत सुमारे आठ हजार ६०१ बालके मध्यम वजनाची आढळली आहेत. याकडे गांभीर्याने विचार न केल्यास ठाणे जिल्ह्याचादेखील मेळघाट होण्यास विलंब लागणार नसल्याचे बोलले जात आहे.
बालकांच्या तुलनेतील कुपोषणाची टक्केवारी
कुपोषित बालकांना अतिरिक्त आहार देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने १५ लाखांच्या मूळ तरतूदीत वाढ करून घेतली. सुमारे २२ लाख ६० हजारांनी वाढीव तरतूद केलेली दिसून येत आहे.
दरवर्षी लाखोंच्या तरतूद करूनही जिल्ह्यास लागलेला कुपोषणाचा कलंक मात्र पुसल्या जात नसल्याची बाब गंंभीर आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील एक लाख १२ हजार ४०० बालकांच्या तुलनेत ०.१ टक्के बालके तीव्र कुपोषणाचे तर ०.९ टक्के बालके मध्यम कुपोणाचे असल्याचे सांगून जिल्हा यंत्रणा आपले कर्तव्य श्रेष्ठ असल्याचे पटवून देण्यात आघाडीवर दिसून येत आहे.