२८ दिवसांत वाढले १ हजार ५७९ रुग्ण; झोपडपट्टी भागात अधिक बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 03:27 AM2020-05-24T03:27:05+5:302020-05-24T06:24:16+5:30
वागळे इस्टेट आणि मुंब्रा भागातही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
ठाणे : ठाण्यात मागील २८ दिवसांत तब्बल १ हजार ५७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हे बहुतांश रुग्ण झोपडपट्टी भागातील असून मुंब्रा, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट या भागातील आहेत. परिणामी आता किसननगर भागात दोन ठिकाणी फिव्हर क्लिनिक सुरू झाले आहेत.
शुक्रवारी एकाच दिवसात कोरोनाचे १९७ नवे रुग्ण आढळले. यात लोकमान्य, सावरकरनगर भागात तब्बल ६९ रुग्णांची नोंद एकाच दिवशी झाली.
वागळे इस्टेट आणि मुंब्रा भागातही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. परंतु गुरुवारी काही अहवाल उशिराने आल्याने आणि खासगी लॅबच्या विरोधात उचललेल्या पावलामुळे त्यांच्याकडून योग्य असे अहवाल आता येऊ लागल्यामुळेच शुक्रवारी रुग्णांची संख्या वाढल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. लोकमान्यनगर, वागळे इस्टेट या भागात स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी तयार करून ती विनाकारण घराबाहेर पडणाºयांवर अंकुश ठेवणार आहे. जेथे रुग्ण आढळले आहेत, तेथील नागरिकांमध्ये काही लक्षणे दिसतात का याचा सर्व्हे केला जाणार आहे.
कल्याण-डोंबिवलीतील रुग्ण ७०० पार
कल्याण : केडीएमसी हद्दीत शनिवारी कोरोनाचे नवे ३० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ठाकुर्ली पूर्वेतील नऊ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, महापालिका हद्दीतील रुग्णांची एकूण संख्या ७२७ झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेत १२, पूर्वेत पाच, कल्याण पश्चिमेत २, पूर्वेत नऊ, टिटवाळ्यात एक व ठाकुर्लीतील मुलाचा समावेश आहे. यामध्ये ११ महिला व उर्वरित पुरुष आहेत. उपचाराअंती आतापर्यंत २६८ जणांना घरी सोडले असून, ४११ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात १३८ कंटेनमेंट झोन आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहून कंटेनमेंट झोन खुला केला जात आहे.
एका कुटुंबात ४५ जण
किसननगर भागातील एकाला कोरोनाची लागण झाली. त्याच्या घराचा सर्व्हे केला असता त्याच्या कुटुंबात ४५ नागरिक असल्याची माहिती उघड झाली. असाच प्रकार अनेक घरांमध्ये दिसून आला. येथील घरे एकमेकांना खेटून असल्याने व सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जात असल्याने हे प्रमाण वाढताना दिसत आहे.