हरवलेली १५८२ मुले घरी परतली
By Admin | Published: December 14, 2015 01:14 AM2015-12-14T01:14:58+5:302015-12-14T01:14:58+5:30
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मुले, महिला व पुरूष हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत १६३९ मुले हरवली
सुरेश लोखंडे, ठाणे
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मुले, महिला व पुरूष हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत १६३९ मुले हरवली. ‘आॅपरेशन स्माईल’ राबवून अशा हरवलेल्या १५८२ मुलांना पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे. मात्र ५१ बालके गेली पाच वर्षे आई-वडिलांच्या प्रतीक्षेत आहेत.
ठाण्याचे खा. राजन विचारे यांनी महाराष्ट्रातील हरवलेल्या महिला व मुलांची माहिती संसदेत विचारली होती. त्यानुसार जिल्ह्यातील किती मुले हरवली व त्यापैकी किती जणांचा शोध लागला, अशी विचारणा लोकमतने पोलिसांकडे केली. त्यानुसार जुलैपर्यंत १६३९ बालके हरवल्याचे ‘आॅपरेशन मुस्कान’मधून उघड झाले. यातील १४०८ बालके पाच वर्षाच्या कालावधीत हरवली होती. त्यापैकी १३५७ बालकांना आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले. यातील ५१ बालकांच्या आई-वडिलांचा अद्याप शोध लागलेला नाही. ‘आॅपरेशन मुस्कान’ हा उपक्रम एक महिन्याच्या कालावधीसाठी ३१ जुलैपर्यंत हाती घेतला होता. त्याव्दारे २३५ मुले शोधून काढली. २३३ ठाणे, मुंबई परिसरातील होती. तर दोन मुले राज्याबाहेरील होती. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना स्वाधीन केले.