ठाण्यात चार महिन्यात १६ बालमृत्यू: महापालिकेच्या आढावा बैठकीत उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:48 AM2021-09-17T04:48:00+5:302021-09-17T04:48:00+5:30
ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचाही धोका वर्तविला जात आहे. त्यातच महापालिकेने घेतलेल्या बालमृत्यू आढावा बैठकीत ...
ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचाही धोका वर्तविला जात आहे. त्यातच महापालिकेने घेतलेल्या बालमृत्यू आढावा बैठकीत गेल्या चार महिन्यात ठाणे महापालिका हद्दीत १६ बालकांचा मृत्यू ओढावल्याची बाब समोर आली. जून महिन्यात सर्वाधिक सात बालमृत्यू झाल्याची नोंद झाली. या बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शहरातील बालमृत्यूंचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांचा अवलंब करून विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या बालमृत्यू अन्वेषण समितीची आढावा बैठक माळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी बैठकीत एप्रिल ते जुलै २०२१ या काळात झालेल्या बालमृत्यूबाबत चर्चा झाली. ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एप्रिल- एक, मे- दोन, जूनमध्ये सात तर जुलैमध्ये सहा बालमृत्यू झाल्याचे समोर आले. या काळात झालेल्या सर्व बालमृत्यूंची वैद्यकीय कारणे समितीसमोर सादर करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सुनीता उबाळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलजा पोतदार, ठाणे अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सचे डॉ. राम गुंडाळे, डॉ. संजय किनरे यांच्यासह महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्राचे तसेच खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.