भिवंडीत 16 गोदामे जळून खाक, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 09:46 AM2017-12-07T09:46:18+5:302017-12-07T12:12:53+5:30
सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली.
भिवंडी : सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अग्निप्रतिबंधक साधने नसल्याने सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आग पसरत गेली. त्यातील प्लॅस्टिक आणि इतर साहित्याचा विषारी धूर यामुळे वातावरण प्रदूषित झाले. सात तासांच्या अथक परिश्रमानंतर संध्याकाळी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यात जीवितहानी झाली नाही.
मुंबई-नाशिक मार्गाजवळच्या ओवळी गावाच्या हद्दीत सागर कॉम्प्लेक्समधील चेक पॉइंट या गोदामाला बुधवारी सकाळी १०च्या सुमारास आग लागली. वाºयामुळे तिचा धोका वाढत गेला. एकेक करत सायंकाळपर्यंत १६ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. या भागांत अनेक गोदाम असून, बºयाच ठिकाणी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही. आज लागलेल्या आगीमुळे येथील गोदाम व कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जीवितहानी नाही :
गोदामे जळून खाक झाल्याने शेकडो कामगार बेरोजगार झाल्याची माहिती कामगारांनी दिली. आगीमुळे परिसरात विषारी धूर पसरला होता. धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडथळा येत होता. वाºयामुळे धूर महामार्गावर येत असल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. आग विझविण्यासाठी भिवंडीसोबतच ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर येथून बंब मागविण्यात आले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
राजकीय आशीर्वादाचा फटका
या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे आहेत. परवानगी न घेता, त्यात माल साठविला जातो. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे, ती तोडण्याचे आणि जमिनी मोकळ्या करण्याचे प्रयत्न तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सुरू केले होते. मात्र, गोदाम मालकांनी राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबविली. त्याचा फटका मोठ्या लोकसंख्येला बसला. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभागासह अन्य सरकारी खात्यांचे आता या गोदामांवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे तेथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. विषारी वायूमुळे परिसरातील गावकरी आणि कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.