विरोध डावलून १६० कोटींचा आपला दवाखाना प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:58 PM2019-06-21T23:58:49+5:302019-06-21T23:58:57+5:30
ज्यांना हवे त्यांच्याच प्रभागात आरोग्य केंद्र; आयुक्तांचे स्पष्टीकरण
ठाणे : किसननगर आणि कळवा येथे सुरू केलेली आपला दवाखाना ही संकल्पना पूर्णत: फोल ठरली असल्याचा आरोप करून एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ठाण्यात २६ आरोग्य केंद्रांची गरज असताना अतिरिक्त ५० केंदे्र सुरू करून सुमारे १६० कोटी रु पयांची उधळपट्टी करण्याचे कारण काय, असा सवाल करत शुक्रवारच्या महासभेत विरोधकांनी आपला दवाखाना या संकल्पनेच्या खर्चावर आक्षेप घेतला. अखेर, आयुक्तांनी ज्या नगरसेवकाला आपला दवाखाना नको असेल, त्यांच्या प्रभागात ही योजना राबवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही विरोधकांनी या योजनेला विरोध कायम ठेवला. अखेर, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा विरोध नोंदवून गोंधळात हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
शहराच्या विविध भागांत एकूण ५० आपला दवाखाना (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. महानगरपालिकेने मेडिकल आॅन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये ‘आपला दवाखाना’ (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना राबवण्याचे प्रस्तावित केले आहे. आरोग्य केंद्र सुरू करताना दर ५० हजार नागरिकांमागे ते एक असावे, असा नियम आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सध्या २६ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी ५० टक्के लोक हे चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास आहेत. या आरोग्य केंद्रांचा वापर करणाऱ्यांची लोकसंख्या पाहता ठाणे शहरात २६ आरोग्य केंद्रांची गरज आहे. आजमितीला ठाण्यात २८ आरोग्य केंद्रे आहेत. त्यामुळे अतिरिक्त ५० केंदे्र सुरू करून ठाणेकरांच्या १६० कोटी रु पयांची उधळपट्टी कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रु ग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत, त्याच सुविधांसाठी ‘आपला दवाखाना’मध्ये १० रु पये दर आकारला जाणार आहे. शिवाय, ही संकल्पना सर्वात आधी किसननगर आणि कळवा येथे राबवण्यात आली होती. मात्र, ती फोल ठरलेली आहे. त्यातही प्रस्ताव मंजूर होण्याआधीच निविदा काढल्याचा आरोपही त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे
आरोग्यदायी योजना नाव द्या
यापूर्वी ज्या दोन ठिकाणी हे प्रयोग राबवण्यात आले होते, ते यशस्वी झाल्याचे स्पष्टीकरण आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे यांनी दिले. मागील तीन महिन्यांत या आरोग्य केंद्रांमधून आठ हजार रुग्णांवर उपचार झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या संकल्पनेला आमचा विरोध नसून त्यावर केल्या जाणाºया खर्चावर आक्षेप असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या मुद्याला हात घालून ही योजना यशस्वी असून चांगली असल्याचे सांगितले.
त्यामुळे या योजनेचे यापुढे बाळासाहेब ठाकरे आरोग्यदायी योजना असे नामकरण करण्यात यावे आणि या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यानंतर, विरोधकांचा विरोध वाढतच असल्याचे दिसून आले.
जेवढ्या रुग्णांवर उपचार, तेवढेच बिल
आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याबाबत माहिती देताना केवळ आपल्या देशातच नाही, तर प्रगत देशातही आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. डॉक्टरांची संख्याही प्रत्येक ठिकाणी कमी आहे. ठाण्यात तर कळवा हॉस्पिटलच्या माध्यमातून रोजच्या रोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
ही योजना गरिबांसाठी असून त्याचा खरा उपयोग त्यांनाच होणार आहे. तसेच ज्या संस्था हे उपक्रम चालवणार असतील, त्यांच्याकडे जेवढे रुग्ण उपचार घेणार आहेत, तेवढेच बील त्यांना अदा केले जाणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा पुन्हा विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
खर्चाच्या मुद्यावर जो काही आक्षेप घेण्यात आला आहे, त्यावर जर एखादी दुसरी संस्था यापेक्षा कमी खर्चात ही संकल्पना राबवण्यास तयार असेल, त्यालासुद्धा हे काम देता येऊ शकते. तशी संस्था लोकप्रतिनिधींनी सुचवल्यास त्याचेही स्वागत केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.