१६ हजार कर्मचाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार

By admin | Published: April 17, 2016 01:05 AM2016-04-17T01:05:05+5:302016-04-17T01:05:05+5:30

सुमारे दीड वर्षापूर्वी उदयाला आलेल्या पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता पडू नये, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ११ हजार १५१ शिक्षकांसह १६ हजार कर्मचाऱ्यांपैकी

16,000 staffs | १६ हजार कर्मचाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार

१६ हजार कर्मचाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार

Next

- सुरेश लोखंडे,  ठाणे
सुमारे दीड वर्षापूर्वी उदयाला आलेल्या पालघर जिल्हा परिषदेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता पडू नये, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ११ हजार १५१ शिक्षकांसह १६ हजार कर्मचाऱ्यांपैकी अनेकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार समायोजनेखाली पालघरमध्ये बदल्या होणार आहेत. बिंदू नामावलीनुसार होणाऱ्या या बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे- पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमधील कर्मचारी संख्या समान ठेवण्यासाठी राज्य शासनाने या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्र शासन निर्णय जारी केला आहे. विभाजन होऊनही आदिवासी, दुर्गम भागातील बदल्यांचे संकट मात्र पाठ सोडत नसल्यामुळे शिक्षकांसह अन्य सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे. यासाठी १ जानेवारी २०१५ ची अंतिम ज्येष्ठतासूची या समायोजन बदल्यांसाठी प्रमाणभूत मानली आहे.
प्राप्त माहितीनुसार पालघर जिल्ह्यातून सुमारे एक हजार ४११ शिक्षक ठाणे जिल्ह्यात येण्यास पात्र ठरत असल्याचे बोलले जात आहे. तर, ठाणे जिल्ह्यातून केवळ सात शिक्षक पालघरमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. परंतु, या सक्तीच्या बदल्यांना पात्र ठरणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची माहिती ठाणे जिल्हा परिषदेने गुप्त ठेवली आहे. मात्र, एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या दरम्यान या बदल्या निश्चित केल्या जाणार आहेत. त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
या बदल्यांसाठी बिंदू नामावलीचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. त्यात सेवाज्येष्ठता यादी बदल्यांसाठी पात्र धरली जाणार आहे. यानुसार, होणाऱ्या बदल्यांमधून अपंग कर्मचारी, दुर्धर व गंभीर आजाराने पीडित कर्मचारी, ५३ वर्षे व त्यावरील वयाचे कर्मचारी आणि शासकीय सेवेतील पतीपत्नी एकत्रीकरण आणि विकल्प असलेल्यांना सवलत देण्याचे निश्चित केले आहे. उर्वरित बदली झालेल्या दोन्ही जिल्हा परिषदांमधील कर्मचारी, शिक्षक यांची प्रतीक्षा यादी तयार होऊन भविष्यात त्यांना पसंतीच्या ठिकाणी बदली करणे शक्य होणार आहे.
रिक्त जागी दोन्ही जिल्हा परिषदांना भरती करता येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. पण, दोन्ही जिल्हा परिषदांचे कर्मचारी, शिक्षक संख्या समान ठेवण्यासाठी काढलेला शासन निर्णय हा अन्यायकारक असल्याची चर्चा ठाणे जिल्हा परिषदेत ऐकायला मिळत आहे.
कर्मचाऱ्यांसह शिक्षकांमध्ये बदल्यांचा विषय जोरदारपणे चर्चीला जात असून यादीत आपले नाव येणार नाही, यासाठीदेखील काहींचे प्रयत्न सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे.

Web Title: 16,000 staffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.