उल्हासनगरमध्ये खड्ड्यांत गेलेले रस्ते बाहेर काढण्यासाठी १७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:43 AM2021-09-25T04:43:51+5:302021-09-25T04:43:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे दरराेज लहान-माेठे अपघात घडत असून, वाहनचालक, प्रवासी ...

17 crore for digging out potholed roads in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये खड्ड्यांत गेलेले रस्ते बाहेर काढण्यासाठी १७ कोटी

उल्हासनगरमध्ये खड्ड्यांत गेलेले रस्ते बाहेर काढण्यासाठी १७ कोटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे दरराेज लहान-माेठे अपघात घडत असून, वाहनचालक, प्रवासी कंबरदुखी, पाठदुखीनेही बेजार झाले आहेत. पावसाळा सुरू हाेण्यापूर्वी पालिकेने खड्डे न भरल्यामुळे नागरिकांना या मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे चाेहाेबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. त्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने पाऊस थांबताच या रस्त्यांची दुरुस्ती हाती घेऊन खड्डे भरण्यात येतील. त्यासाठी १७ काेटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

उल्हासनगरातील रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्यासाठी महापालिकेने साडेसहा कोटींच्या निधीची तरतूद केली. मात्र, तांत्रिक कारण व पाऊस सुरू झाल्याने रस्तेदुरुस्ती व खड्डे भरण्याचे काम अडकले. मात्र, आधीच दुरवस्था झालेल्या रस्त्याची पावसामुळे पार वाट लागली आहे. खडी, रेतीने हे खड्डे बुजवून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न पालिकेने केला. मात्र, ही खडी पावसामुळे इतरत्र विखुरल्यामुळे दुचाकीस्वारांना त्याचा आणखीनच त्रास सुरू झाला. शुक्रवारी शिवाजी चौक परिसरात एक वृद्ध खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पाऊस थांबताच रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. रस्त्यातील खड्डे व दुरवस्था बघता १० कोटींच्या वाढीव निधीला मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी साडेसहा कोटी व पुन्हा १० कोटी असे एकूण १६ काेटी ५० लाखांच्या निधीतून रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम करण्यात येणार आहे. पाऊस थांबताच रस्ते चकाचक दिसणार असल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली.

खड्ड्यांचे भरवणार प्रदर्शन

महापालिकेतील ७० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे असल्यामुळे या रस्त्यांच्या दर्जाबाबतची चर्चा शहरात रंगली आहे. डांबरी रस्त्यांसह सिमेंट रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिकेच्या कारभारावर सर्व स्तरातून टीका होत आहे. मनसेने नागरिकांकडून खड्ड्यांचे फाेटाे मागवले असून, त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पाच उत्कृष्ट फाेटाेंना बक्षीसही जाहीर केले आहे. तर, मनसे वाहतूक शाखेने जबाबदार अधिकाऱ्यांच्या कानशिलात मारण्याचाही इशारा दिला आहे.

Web Title: 17 crore for digging out potholed roads in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.