ठाण्यात साडेचार महिन्यांत गॅस गळतीच्या १७ घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 10:05 AM2023-10-21T10:05:04+5:302023-10-21T10:05:16+5:30
सात घरगुती गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोघांना मृत्यू झाला आहे, तर फायरमनसह चौघेजण जखमी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घरगुती गॅस सिलिंडर असो या गॅस पाइपलाइन तसेच रिक्षातील सीएनजी असो किंवा रुग्णालयातील ऑक्सिजन गॅस गळतीच्या घटनांची ठाण्यात जणू मालिकाच सुरू आहे. १ जूनपासून १५ ऑक्टोबरपर्यंत तब्बल १७ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. सात घरगुती गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोघांना मृत्यू झाला आहे, तर फायरमनसह चौघेजण जखमी झाले आहेत. याशिवाय घरगुती वस्तूंसह कपडे आदी साहित्य जळूनही नुकसान झाले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजीपूर्वक जावे. गॅस सिलिंडर बंद केला आहे की नाही किंवा गॅसचा वास येत असल्यास तातडीने दारे, खिडक्या उघडा, असे आवाहन केले जात आहे.
१५ दिवसांत सात घटना
वागळे इस्टेट येथे रुग्णालयामधील ऑक्सिजन सिलिंडरमधून गॅस गळती झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीतील गॅस गळतीचा आढावा घेतला असता ऑक्टोबरच्या १५ दिवसांत गॅस गळतीच्या सर्वाधिक सात घटना घडल्या आहेत, तर जून, जुलै व ऑगस्टमध्ये प्रत्येकी दोन घटना असून, सप्टेंबरमध्ये चार घटनांची नोंद झालेली आहे.
आगीच्या घटनांचा तक्ता
महिना घटना मृत्यू जखमी
जून ०२ ०० ००
जुलै ०२ ०० ००
ऑगस्ट ०२ ०० ००
सप्टेंबर ०४ ०० ०१
ऑक्टोबर ०७ ०२ ०३