हळबेंसह १७ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:08 AM2017-07-20T04:08:12+5:302017-07-20T04:08:12+5:30
पूर्वेकडील पार्श्व इंडस्ट्रियल प्रिमायसेस सोसायटीमधील कमिटी सदस्यांनी चुकीची माहिती देऊन सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याच्या आरोपाखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्वेकडील पार्श्व इंडस्ट्रियल प्रिमायसेस सोसायटीमधील कमिटी सदस्यांनी चुकीची माहिती देऊन सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याच्या आरोपाखाली १७ जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यात केडीएमसीचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांचेही नाव गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया हळबे यांनी दिली आहे.
सोसायटी मेंटेनन्स खर्चाची चुकीची आकडेवारी देणे, आपापसात संगनमत करून खर्चाच्या नोंदीत खाडाखोड करून सरकारचा महसूल बुडवणे, बेकायदा गाळे बांधणे, स्वत:च्या फायद्यासाठी एक कोटी नऊ लाख ८४ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हळबे, सोसायटीचे अध्यक्ष मुकुंद इनामदार आणि अन्य १५ जणांविरोधात शरद जोशी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सोसायटीचे १२, तर विकासकाचे पाच सदस्य आहेत. इनामदार यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. ही सोसायटी मी पाच वर्षांपूर्वीच सोडल्याचे हळबे यांनी स्पष्ट केले. २२ फेब्रुवारी ते १८ जुलै या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.