ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगताना पसार झालेल्या आरोपीस १७ वर्षांनंतर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 08:07 PM2018-02-08T20:07:07+5:302018-02-08T20:13:13+5:30
संचित रजेवर बाहेर आल्यावर आपले अस्तित्व लपवत होता. अशाप्रकारे १७ वर्षानंतर मात्र, त्याची ओळख पुढे आल्यावर पोलिसांनी त्याला थेट परराज्यात बेड्या घातल्या आहेत.
ठाणे : खुनाच्या गुन्ह्यामध्ये मूळचा उत्तर प्रदेशमधील वेदप्रकाश वीरेंद्रकुमार सिंह (४८) याला ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, तो पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. याचदरम्यान, तो १४ दिवसांच्या संचित रजेवर सुटल्यावर पुन्हा कारागृहात हजर झालाच नव्हता. तेव्हापासून पसार असलेला वेदप्रकाश याला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने बुधवारी तब्बल १७ वर्षांनंतर उत्तर प्रदेश येथून अटक करून त्याला वर्तकनगर पोलिसांच्या हवाली केले आहे.
स्थावर मालमत्तेच्या वादावरून ठाण्यातील करवालोनगर येथे राहणारे रामनारायण खरबानी सिंग यांच्यावर ५ डिसेंबर १९९४ रोजी प्रयागसिंग भारती सिंग, वेदप्रकाश वीरेंद्रकुमार सिंग आणि अशोककुमार उपेंद्र सिंग या त्रिकुटाने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी करून रामनारायण यांना जीवे मारले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर १९९७ साली ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तसेच एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्यांची सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली होती. त्या गुन्ह्यात आरोपी वेदप्रकाश हा पुणे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. १८ जून २००१ रोजी पुणे पश्चिम विभागाचे कारागृह उपनिर्देशक यांच्या आदेशानुसार, तो १४ दिवसांच्या संचित रजेवर सुटला होता. तेव्हापासून तो संचित रजेवरून परत कारागृहात हजर न झाल्याने अखेर २०१३ साली कारागृह पोलीस कर्मचारी हेमंत शिवाजी कोरडे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, २००१ पासून पसार असलेला वेदप्रकाश हा आपले अस्तित्व लपवून उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे राहत असल्याची ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी मिळाली होती. त्यानुसार ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, पोलीस हवालदार आनंदा भिलारे, सुनील जाधव, पोलीस नाईक संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड यांचे पथक तातडीने उत्तर प्रदेशला रवाना झाले. तसेच त्याच्या शोधासाठी या पथकाने उत्तर प्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सची मदत घेऊन त्याला अटक केली. तसेच २०१३ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्याचा ताबा वर्तकनगर पोलिसांकडे दिला आहे.