शहरातील १७५ रुग्णालयांनी केली अग्निसुरक्षा सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:20 AM2021-02-28T05:20:02+5:302021-02-28T05:20:02+5:30
ठाणे : जानेवारीत भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठामपा हद्दीतील सर्व रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासण्याचे आदेश महापालिका आयुक्त ...
ठाणे : जानेवारीत भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठामपा हद्दीतील सर्व रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका अग्निशमन दलाने खाजगी आणि सरकारी मिळून ३८१ रुग्णालयांना नोटिसा बजावून अग्निसुरक्षा सक्षम करण्याच्या सूचना करून ३० दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार आतापर्यंत १७५ रुग्णालयांनी अग्निसुरक्षा सक्षम केली आहे. इतर रुग्णालयांतही हे काम सुरू असल्याचा दावा अग्निशमन विभागाने केला आहे.
महापालिका हद्दीत अशी अनेक रुग्णालये आहेत जी दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींत सुरू आहेत. जिथे अनेक ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष करून कारभार चालवला जात होता. भंडारा येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर १४ जानेवारीपासून अग्निशमन दलाने सुरू केलेल्या या तपासणी मोहिमेनंतर सर्वच रुग्णालय प्रशासनांत खळबळ उडाली आहे. त्यानुसार या रुग्णालयांना तपासणीनंतर अग्निशमन दलाने केलेल्या सूचनेनुसार ३० दिवसांत त्यांच्या येथील अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करणे बंधनकारक होते. तशा प्रकारची दुरुस्ती न केल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाणार होती. यात ३८१ खाजगी रुग्णालयांची पाहणी अग्निशमन दलाने केली होती. त्यानंतर या सर्वांना योग्य त्या सुरक्षा यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत १७५ खाजगी रुग्णालयांनी त्यांच्या येथे सक्षम अशी अग्निसुरक्षा यंत्रणा उभारली आहे. तर इतर रुग्णालयांमध्ये अशी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे ३४ सरकारी रुग्णालयांना अशाच प्रकारच्या सूचना केल्या होत्या तिथेही काम प्रगतिपथावर सुरू आहे.
यासंदर्भात अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आयुक्तांच्या आदेशानुसार आम्ही रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी केली. त्यात ३८१ रुग्णालयांची पाहणी करून प्रत्येक रुग्णालयाला त्यांची अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यास ३० दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार १७५ रुग्णालयांनी ती सक्षम केली आहे.