१,७७७ कुपोषितांना मुसळधार पावसाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 06:40 AM2018-06-10T06:40:08+5:302018-06-10T06:40:08+5:30

ठाणे जिल्ह्यात तीव्र कमी वजनासह मध्यम वजनाची १० हजार ७६४ बालके कुपोषित आहेत. यातील तीव्र कमी वजनाच्या एक हजार ७७७ कुपोषित बालकांच्या जीवितास संभाव्य मुसळधार पावसात धोका संभवण्याची शक्यता आहे.

1.777 malnourished heavy rainfall risk | १,७७७ कुपोषितांना मुसळधार पावसाचा धोका

१,७७७ कुपोषितांना मुसळधार पावसाचा धोका

Next

- सुरेश लोखंडे
ठाणे -  जिल्ह्यात तीव्र कमी वजनासह मध्यम वजनाची १० हजार ७६४ बालके कुपोषित आहेत. यातील तीव्र कमी वजनाच्या एक हजार ७७७ कुपोषित बालकांच्या जीवितास संभाव्य मुसळधार पावसात धोका संभवण्याची शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी वेळीच पावसाळी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
मध्यम व कमी वजनाच्या १० हजार ७६४ कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. मात्र, जिल्ह्यात सद्य:स्थितीला कुपोषित बालकांसाठी कोणतीही उपाययोजना हाती घेतलेली नसल्याची चिंता सामाजिक संघटनांकडून होत आहे. आरोग्य विभागाकडून औषधोपचार होत असल्याचे आढळून आले. मध्यम व तीव्र कमी वजनाच्या बालकांना संभाव्य मुसळधार पावसाच्या कालावधीत पोषण व पोषक आहाराअभावी धोका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आदिवासी दुर्गम भागतील सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात सहा वर्षे वयोगटांपर्यंतचे एक लाख ३० हजार बालके आहेत. यापैकी एक लाख ११ हजार ८३४ बालकांचे वजन घेऊन त्यातील सुदृढ म्हणजे सर्वसाधारण एक लाख एक हजार ७० बालके आढळून आली. मात्र, मध्यम कमी वजनाची आठ हजार ९८७ बालकांसह तीव्र कमी वजनांची एक हजार ७७७ बालके कुपोषणाची आहेत. यातील या एक हजार ७७७ बालकांच्या जीवितास पोषक आहाराअभावी धोका संभवतो. यंदा सर्वाधिक काळ मुसळधार पावसाचा असल्याची शक्यता आहे. यादरम्यान दुर्गम, आदिवासी भागात रोजगार समस्या तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कुपोषित बालकांकडे आदिवासी मातापित्याचे दुर्लक्ष होऊन ते मृत्यूच्या चक्रव्यूहात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कुपोषित बालकांमध्ये एक हजार ७७७ तीव्र बालकांप्रमाणेच १३५ दुर्धर आजारांच्या बालकांना या पावसाळ्यात मरणयातना भोगाव्या लागण्याची दाट शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग आणि आदिवासी-दुर्गम भागाचे दायित्व स्वीकारलेल्या आदिवासी विकास विभागाने या कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी वेळीच उपाय शोधण्याची आवश्यकता आहे.
या बालकांच्या पालकांना उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातदेखील कामांची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. पोषक असलेल्या पोषण आहाराची खास व्यवस्था गरजेची आहे. शिवाय, कुपोषण औषधोपचार पथक तैनात करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.
याआधी दिल्या जाणाऱ्या खावटी कर्जाच्या स्वरूपातील आर्थिक मदतीप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा या कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांना होणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Web Title: 1.777 malnourished heavy rainfall risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.