भयंकर! रुग्णालयात १२ तासांत गेले १८ जीव; डॉक्टर, पुरेसे कर्मचारी नसल्याने मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 05:56 AM2023-08-14T05:56:57+5:302023-08-14T05:57:23+5:30

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टला पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता.

18 lives lost in hospital in 12 hours due to doctors deaths due to insufficient staff | भयंकर! रुग्णालयात १२ तासांत गेले १८ जीव; डॉक्टर, पुरेसे कर्मचारी नसल्याने मृत्यू 

भयंकर! रुग्णालयात १२ तासांत गेले १८ जीव; डॉक्टर, पुरेसे कर्मचारी नसल्याने मृत्यू 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे/मुंबई : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टला पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता.  त्यानंतर रविवार सकाळपर्यंत म्हणजे १२ तासांत आणखी १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात असून, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनाही कात्रीत पकडून जाब विचारला आहे.

आरोग्य संचालक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मृत्यू झालेले रुग्ण ३ ऑगस्ट ते १२ ऑगस्टदरम्यान रुग्णालयात दाखल झाले होते. १३ रुग्णांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर पाच रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. या वृत्तास रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. रुग्णालयाच्या दाव्यानुसार मृत्यू झालेले रुग्ण ३३ ते ८३ वर्षांचे होते. काही वयोवृद्ध तर नऊ रुग्ण खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ अवस्थेत शेवटच्या क्षणी दाखल करण्यात आले होते.

रुग्णांना होते गंभीर आजार?

दगावलेल्या रुग्णांपैकी काही अपघातग्रस्त होते. अल्सर, लिव्हर खराब होणे, न्यूमोनिया, विष प्राशन, डायलिसिस, डोक्याला मारहाण, युरिन इन्फेक्शन, ऑक्सिजनची कमतरता, बीपी कमी होणे, ताप आदींमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. मृत्यू झालेल्यांमध्ये एका ४ वर्षीय मुलाचा समावेश असून, त्याचा मृत्यू कसा झाला, याची माहिती मात्र मिळू शकली नाही.  

दोन दिवसात दोषींवर कारवाई : आरोग्यमंत्री 

पुणे : रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशाप्रकारे रुग्णांच्या जिवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. येत्या दोन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल पाहून दाेषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात दिली. मृत्यू झालेल्यांपैकी १३ रुग्ण आयसीयू वॉर्डमधील, तर चार रुग्ण जनरल वाॅर्डमधील आहेत. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे गुलदस्त्यात आहे. याबाबत आराेग्यमंत्री सावंत म्हणाले की, ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून याप्रकरणात नेमकं काय घडलं? हा विषय समजून घेऊ, त्यानंतर दोन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त झाला की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

चौकशी समिती नियुक्त 

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती नेमण्यात आली. समितीत आरोग्यसेवेचे आयुक्त, आरोग्य संचालक, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जे.जे. रुग्णालयाचे तज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक आदींचा समावेश आहे.

उपचारांचा प्रश्न गंभीर का? 

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा भार कळवा रुग्णालयावर वाढला आहे. तुलनेत डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याने उपचारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानादेखील प्रशासनाला जाग आली नाही. ही अतिशय दुर्दैवी बाब असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.     - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस.

मी माझ्या भावाला उपचारासाठी कल्याण येथून आणून या रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे त्याचा मृत्यू झाला. सकाळपासून शवविच्छेदनाची मागणी करत आहे. ती पूर्ण होत नाही. - नीता राजे, रुग्णाचे नातेवाईक.

माझ्या मुलाने रॉकेल पिल्यामुळे चार दिवसांपासून तो येथे उपचार घेत होता. परंतु तो गंभीर आहे का? याबद्दल डॉक्टरांनी काही माहिती दिली नाही. रात्री त्याला मृत घोषित केले. - सुनील गोडे, मृत रुग्णाचे वडील


 

Web Title: 18 lives lost in hospital in 12 hours due to doctors deaths due to insufficient staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.