कळव्यात १८ रुग्णांचा मृत्यू, दोषींवर कारवाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 07:25 AM2023-12-21T07:25:03+5:302023-12-21T07:25:22+5:30
१२ ऑगस्टला रात्री रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा गोपनीय अहवाल शासनास प्राप्त झाला असून, हा अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. यामध्ये जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. या संदर्भात सदस्य अनिल परब यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेदरम्यान सामंत बोलत होते.
१२ ऑगस्टला रात्री रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यातील शिफारशींनुसार कारवाई करण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सात व
छत्रपती संभाजीनगर येथे १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू उपचाराअभावी झाला नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने कळविले आहे.
‘रिक्त पदे तातडीने भरा’
राज्यातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेशी निगडित अत्यावश्यक पदे तातडीने भरण्याबाबत तसेच औषध पुरवठा नियमितरीत्या उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
रुग्णालयासाठी अधिकारी व कर्मचाऱी यांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे रुग्णसेवेमध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होत नाहीत, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.