आरटीओकडून १८ खाजगी बसवर कारवाई; अवैध वाहतुकीला आळा बसण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:52 AM2019-06-06T00:52:43+5:302019-06-06T00:52:47+5:30
प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाहतुकीला आळा बसेल, असे बोलले जात आहे.
ठाणे : खाजगी बसचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले असून त्याला अद्याप आळा बसू शकलेला नाही. वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून वारंवार दंडात्मक कारवाई केली जात असली, तरीसुद्धा या बस बिनबोभाटपणे रस्त्यावर धावताना दिसत आहेत. मागील दोन दिवसांत आरटीओकडून १८ खासगी बसवर थेट जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, याच काळात मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे या कारवाईला ब्रेक लागला आहे. परंतु, ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले.
प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाहतुकीला आळा बसेल, असे बोलले जात आहे. ठाणे महापालिकेची परिवहनसेवा सक्षम नसल्याने ठाणे रेल्वेस्थानक ते घोडबंदर तसेच शहरातील इतर मार्गांवरून प्रवास करण्यासाठी नागरिकांना खासगी बस वाहतूक, रिक्षा किंवा इतर सेवांवर अवलबूंन राहावे लागत आहे. मात्र, शहरात या खाजगी बसवाल्यांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. रस्त्यात कुठेही, कशाही पद्धतीने वाहन उभे करणे, परिवहनच्या बसथांब्यांवर खाजगी बस उभ्या करणे. शिवाय, बसचालकांचा मनमानी कारभार यामुळे शहराच्या वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्यामुळे आरटीओकडे आलेल्या विविध स्वरूपांच्या तक्रारीनंतर आरटीओकडून थेट जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. मागील दोन दिवसांत अशा खाजगी बसवर कारवाई करत १८ बस जप्त करण्यात आल्या.
पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तसेच रिक्त झालेल्या जागांवर मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने कारवाईला ब्रेक लागला आहे. परंतु, अवैध खासगी प्रवासी बसविरोधात पुन्हा कारवाईला सुरु वात करण्यात येणार आहे. - नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे