एकेका मतदाराची १८ वेळा नावे!

By admin | Published: July 2, 2017 06:10 AM2017-07-02T06:10:06+5:302017-07-02T06:10:06+5:30

मतदारयाद्यांमधील दुबार नावांवरून नेहमीच टीकेची झोड उठते. पण मीरा- भार्इंदर महापालिकेने निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या

18 voters each of the voters! | एकेका मतदाराची १८ वेळा नावे!

एकेका मतदाराची १८ वेळा नावे!

Next

धीरज परब/ लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मतदारयाद्यांमधील दुबार नावांवरून नेहमीच टीकेची झोड उठते. पण मीरा- भार्इंदर महापालिकेने निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदारयादीत दुबारच नव्हे तर नऊ बार, दहाबारपासून तब्बल अठराबार नावे एकाच मतदाराची असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. आधीच सदोष याद्या व गैरप्रकारांमुळे मतदाननोंदणी अधिकारी व महापालिका संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
नवीन मतदारनोंदणीत तब्बल ९ हजार ५५८ अतिरीक्त नवे मतदार घुसवण्यात आल्याने संशय बळावला आहे. भाजपा वगळता अन्य पक्षांनी या विरोधात आघाडी उघडली असतानाच चक्क १८ वेळा एकाच मतदाराचे नाव आल्याने पालिका व सरकारी यंत्रणांनी अनागोंदीचा कळस गाठला आहे.
मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी २८ जूनला प्रभाग निहाय प्रारूप मतदारयादी अखेर जाहीर केली. आयोगाने ५ जूनपर्यंतच आलेल्या नवीन नावनोंदणी अर्जाची नोंद करण्याचे आदेश दिले होते. तर १३ जूनला प्रसिध्द होणारी विधानसभानिहाय मतदारयादी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम केली. ५ जूनपर्यंत आलेल्या नवीन मतदारनोंदणी व अन्य अर्जांपैकी मीरा- भार्इंदर विधानसभा मतदार संघात जे. एस. पंडित यांनी २१ हजार २७० नव्या मतदारांची नोंदणी केली. तर ओवळा- माजिवडामध्ये स्मितल यादव यांनी २० हजार ३६६ नवीन मतदारांची आलेल्या अर्जानुसार नोंद केली. दोन्ही विधानसभा मतदारसंघातील पालिका हद्दीत झालेल्या नव्या मतदारांची संख्या मिळून ४१ हजार ६३६ इतकी होते.
धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेने २८ जूनला प्रसिध्द केलेल्या पुरवणी यादीमध्ये मात्र तब्बल ५१ हजार १९४ नवीन मतदारांची नावे आली आहेत. त्यामुळे महापालिकेने अतिरीक्त ९ हजार ५५८ नवीन मतदार आणले कसे यावरून खडाजंगी सुरू झाली आहे. त्यातच दुबार नावे तशीच आहेत. छायाचित्र व पत्ते नाहीत. अनेक प्रभागातील मतदारांना परस्पर दुसऱ्या लांबच्या प्रभागात टाकण्यात आले आहे. बोगस मतदान सुरळीत करता यावे म्हणून हा सर्व खटाटोप मतदार अधिकारी व पालिकेने भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या सोयीसाठी चालवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
मतदारनोंदणी व यादीवरून रणकंदन माजले असतानाच एकट्या प्रभाग क्र. २४ मधील मतदारयाद्यांमध्ये अनागोंदी व गैरप्रकाराने कळस गाठला आहे. नगरसेवक बर्नड डिमेलो यांनी तर प्रारूप मतदारयादीत गुप्ता नीरज रवींद्र, पाटील भूषणा राम, पाटील गंगाबाई मदन, चव्हाण भगवान गुहाटी, माछी घनश्याम गोपीचंद, पाटील विश्वनाथ गोपीनाथ, पाल सत्यवती शंभुलाल यांची नावे तब्बल १८ वेळा आहेत. विशेष म्हणजे ही नावे प्रभागातील वेगवेगळ्या पत्त्यांवर आहेत. केळकर मुक्ता उमेश हिचे नाव १० वेळा आहे. ९ वेळा यादीत नावे असणाऱ्यांची संख्या चक्क ११७ इतकी आहे. १३४ जणांची दुबार नावे आहेत. प्रभाग २४ मधून तीन नगरसेवक निवडून द्यायचे असून दुबार, तीबार, नऊबार, दहाबार व अठराबार मतदारांची संख्या पाहता तब्बल दीड हजार नावे कमी होण्याची शक्यता आहे असे डिमेलो म्हणाले.

पालिकेने भाजपाचा कित्ता गिरवला : यादव व पंडित यांनी मतदारनोंदणीचे अर्ज घेताना भाजपाकडून आलेल्या अर्जांना झुकते माप दिल्याचा आरोप करत पडताळणी न करताच मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी झाली. महापालिकेने देखील तोच कित्ता गिरवला आहे. त्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व काटेकोर पडताळणी करून मतदारयाद्या तयार करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह बर्नड डिमेलो, काँग्रेसचे प्रमोद सामंत, अनिल सावंत, मनसेचे प्रसाद सुर्वे आदींनी केली होती.

५१ हजार मतदारांची पुरवणी यादी ही आयोगाकडूनच आम्हाला मिळाली आहे. पुरवणी यादीतील तफावत लक्षात आल्यावर आम्ही आयोगाला कळवले आहे. मतदारनोंदणी संख्येतील तफावत दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे.
- स्वाती देशपांडे, सहाय्यक आयुक्त.

पुरवणी यादीतील तफावत ही संगणकातील तांत्रिक चुकीमुळे झाली असून आमचे कर्मचारी पालिकेत चूक दुरूस्त करण्यासाठी गेले आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणेच अर्जांची छाननी करुन नोंदणी केली आहे.
- जे. एस. पंडित,
नायब तहसीलदार तथा मतदार नोंदणी अधिकारी.

Web Title: 18 voters each of the voters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.