ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १,८२२ नवे रुग्ण; ४३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:33 AM2020-07-19T00:33:49+5:302020-07-19T00:35:40+5:30
ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या हद्दीत १५ हजारांवर रुग्ण
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून यात गुरुवार, शुक्रवारप्रमाणे शनिवारीही मोठी वाढ झाली. शनिवारी दिवसभरात एक हजार ८२२ नव्या रुग्णांसह ४३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यात ६५ हजार ९२७ बाधितांसह एक हजार ८७० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
शनिवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ४७५ नवे रुग्ण सापडले असून नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ४८० तर मृतांचा आकडा २४० वर पोहोचला. ठाणे पालिका हद्दीत ३४२ रुग्णांसह १० जणांचा मृत्यू झाल्याने बाधित संख्या १५ हजार ५१५ तर मृत्यूची संख्या ५६७ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३५२ नव्या रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बाधितांची संख्या ११ हजार ४१० तर मृतांची ३४० इतकी झाली आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये १६८ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या सहा हजार ४०८ झाली. तर, मृतांची संख्या २१९ इतकी झाली आहे. भिवंडी पालिका क्षेत्रात ५७ बाधितांची तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद केल्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ६३ तर मृतांची १७५ वर पोहोचली आहे. उल्हासनगरात १४८ रुग्णांची तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या पाच हजार ४३२ तर मृतांची संख्या ८० झाली आहे.
अंबरनाथमध्ये ६४ रुग्णांसह चौघांचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार ३० तर मृतांची ११६ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ६६ रुग्णांची नोंद झाल्याने त्यांची संख्या एक हजार ८३३ झाली. तर, ठाणे ग्रामीण भागात दीडशे रुग्णांसह एका जणाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या चार हजार २७ तर मृतांची १०७ वर गेली आहे.
डोंबिवली : केडीएमसीच्या आरोग्य विभागाबरोबर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या जनकल्याण समितीच्या १०० कार्यकर्त्यांपैकी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात कल्याण, डोंबिवलीतील प्रत्येकी तिघांचा समावेश आहे.
सध्या ते योद्धे टाटा मंत्रा येथे उपचार घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर, रविवारी त्यातील काहींना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समितीचे जिल्हा कार्यवाह निलेश काळे यांनी दिली. नागरिकांची तपासणी करताना त्यांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. तर, अन्य योद्धे सुखरूप असून, त्यांची नियमित चौकशी सुरू असल्याचे काळे म्हणाले.
ठाण्याच्या कोपरी पूर्व परिसरात असलेल्या गरीब नागरिकांसाठी कोरोनाची चाचणी विनामूल्य करण्यात आली आहे. सबर्बन डायग्नोस्टिक सेंटर आणि तारामाऊली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पिवळ्या-केशरी रेशनकार्डधारकांना या मोफत कोरोना चाचणीचा लाभ
होणार आहे.