१,८५५ मजुरांची दोन दिवसांत घरवापसी, मोफत प्रवासामुळे झाली १८ लाखांची बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 02:24 AM2020-05-12T02:24:40+5:302020-05-12T02:24:57+5:30
आपल्या मुलाबाळांसह कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने परप्रांतीय गावाकडे निघाले होते. जवळपास दीड हजार किलो मीटरचा प्रवास असूनही अनेकजण रात्री बेरात्री हा रस्ता तुडवित जात होते.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : गावी जाण्यासाठी पायी निघालेल्या मजुरांना एसटी आणि स्थानिक पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. दोन दिवसांत ठाणे आणि भिवंडीतून ७० एसटीतून एक हजार ८५५ परप्रांतीय मजूर मध्यप्रदेशच्या सीमेकडे रवाना झाले आहेत. मोफत प्रवासामुळे या परप्रांतीयांची सुमारे १८ लाखांची बचत होणार आहे.
आपल्या मुलाबाळांसह कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने परप्रांतीय गावाकडे निघाले होते. जवळपास दीड हजार किलो मीटरचा प्रवास असूनही अनेकजण रात्री बेरात्री हा रस्ता तुडवित जात होते. शासनाने त्यांना राज्याच्या सीमेपर्यंत एसटीद्वारे मोफत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. ठाणे शहर पोलिसांनी नावे नोंदवून त्यांच्यासाठी ठाणे आगारातून बसची सोय करुन दिली.
अशी मिळाली एसटीकडून बससेवा
मजुरांसाठी ठाण्याच्या आनंदनगर चेकनाका येथून ६६ प्रवाशांना घेऊन तीन बस मध्य प्रदेश सीमेवरील शिरपूर येथे १० मे रोजी दुपारी ४ वाजता रवाना झाल्या. त्यापाठोपाठ माजिवडा सर्कल येथून १३२ प्रवाशांसह सहा बसेस, भिवंडीतील माणकोली नाका येथील ११ बसमधून २७५ प्रवासी धुळे जिल्ह्यातील शेंदवा येथे गेले. रांजणोलीतून २२५ प्रवाशांसह नऊ बस, तीनहातनाका येथून ५० प्रवाशांच्या दोन बस आणि
खारेगाव नाका येथून १०० प्रवाशांच्या चार बस शिरपूरकडे रवाना झाल्या आहेत.
दुसऱ्या दिवशी, ११ मे रोजीही ठाणे पोलिसांनी या परप्रांतीयांची नोंदणी करुन त्यांना बसेसची सुविधा दिली. दिवसभरामध्ये कापूरबावडी येथून ३५२ प्रवाशांसह आठ बस, कोपरीतून ६९ प्रवाशांसह तीन बस तर माणकोलीतून पाच बसमधून १२५ प्रवाशी गेले. याशिवाय, रांजणोलीतून सहा बस (१५६ प्रवासी), तीनहातनाका येथून पाच बस (११५), खारेगाव नाका तीन बसेस (६९), नौपाडा तीन बस (६९) आणि ५५ प्रवाशांच्या दोन बस राबोडीमधून मध्य प्रदेश सीमेकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
रविवारी ३५ बसमधून ८४५ तर मंगळवारी ३५ बसमधून १०१० अशा एक हजार ८५५ परप्रांतीयांना एसटीची मोफत प्रवासाची सुविधा मिळाली. एका प्रवाशाला किमान दोन हजार रुपये भाडे ट्रकचे लागणार होते. त्या हिशेबाने महाराष्टÑाच्या सीमेपर्यंत एक हजारांप्रमाणे १८५५ प्रवाशांच्या सुमारे १८ लाख ५५ हजारांची बचत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.