पाच महिन्यांत जिल्हा रुग्णालयात १८८ नेत्र शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:31+5:302021-04-23T04:42:31+5:30
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतर केल्यानंतर या ठिकाणी केवळ कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ...
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतर केल्यानंतर या ठिकाणी केवळ कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे या रुग्णालयात होणा-या इतर शस्त्रक्रिया बंद केल्या होत्या. कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने व रुग्णसंख्यादेखील कमी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या पाच महिन्यांच्या कालावधीत लहानमोठ्या अशा १८८ शस्त्रक्रिया केल्या असून दोन्ही डोळ्यांच्या ५१ शस्त्रक्रिया केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा शिरकाव झाला. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे एप्रिल २०२० मध्ये कोविड-१९ रुग्णालयात रूपांतर केले. त्या दिवसापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या इतर आजारांवरील रुग्णांचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्थलांतर केले. तसेच या ठिकाणी इतर आजारांवरील नॉन कोविड रुग्णांच्या शस्त्रक्रियेलादेखील ब्रेक लागला होता. त्यात कालांतराने ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून आले. तर, दुसरीकडे रुग्णसंख्यादेखील कमी झाली होती. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून नेत्र शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या. त्यात जानेवारी महिन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचेदेखील आयोजन केले होते. त्यामुळे डोळ्यांच्या आजाराने पीडित असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला. डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या पाच महिन्यांच्या कालावधीत डोळ्यांच्या लहान व मोठ्या अशा १८८ शस्त्रक्रिया केल्या. यामध्ये सर्वाधिक १८३ मोठ्या तर अवघ्या पाच लहान शस्त्रक्रिया केल्या. तसेच टाळेबंदीमुळे नेत्रविभाग बंद असल्यामुळे अनेकांना दोन्ही डोळ्यांनी कमी दिसणे, अनेकांना अंधत्व आले होते. अशा ५१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याची माहिती जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक शुभांगी आंबेडकर यांनी दिली.