ऐतिहासिक ठाणे स्थानकात १८९७ मधील ब्रिटिशकालीन नॅरोगेज इंजिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:11+5:302021-04-02T04:42:11+5:30
अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : भारतात पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला ठाणे ते वाडीबंदर मार्गावर धावली. ...
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : भारतात पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला ठाणे ते वाडीबंदर मार्गावर धावली. रेल्वेच्या इतिहासाच्या या स्मृती जपण्यासाठी ठाणे स्थानकात तेव्हाच्या काळातील वाफेचे इंजिन बसवण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने २०१२ पासून तत्कालीन खासदार, रेल्वे बोर्ड अध्यक्ष ते आताचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे व्यक्त केली होती. अखेरीस गोयल यांनी ती मागणी मंजूर केली आहे. त्यानुसार ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर मुंबईच्या दिशेला बार्शी विभागांतर्गत धावलेल्या १८९७ मधील नॅरोगेजवरील इंजिन आणून बसवण्यात आले आहे.
सव्वाशे वर्षे जुने असलेले हे इंजिन दोन फूट लांब असून सहा इंच रुंद आहे. नॅरोगेज (छोट्या रुळांच्या) मार्गासाठी ते वापरात होते, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ब्रिटिश रेल्वेचे तत्कालीन अभियंता एडवर्ड रिचर्ड कॅलथरोप यांनी त्या इंजिनाची निर्मिती केल्याची नोंद रेल्वेच्या इतिहासात आहे. बार्शी लाइट रेल्वे (बीएलआर)अंतर्गत महाराष्ट्रातील मिरज-लातूर या नॅरोगेज मार्गावर ३२५ किमी लांबपल्ल्याच्या मार्गावर हे इंजिन धावत असे. नॅरोगेजमुळे हा मार्ग खूप प्रसिद्ध होता.
भारतीय रेल्वेचा इतिहास खूप थोर असून त्याबद्दल अनेक राष्ट्रांना अभिमान आहे. ब्रिटिशांमुळे देशभर रेल्वेचे जाळे विकसित झाले आहे. आता काश्मीर घाटी, अरुणाचल, नागालॅण्ड, मणिपूर आशा दुर्गम भागातही रेल्वेचे जाळे विस्तारले आहे. त्या अवाढव्य पसाऱ्यात नव्या पिढीला ठाणे स्थानकाचे महत्त्व माहिती व्हावे आणि प्रगल्भ इतिहासात ठाण्याची नोंद असावी याहून दुसरा तो आनंद काय असेल, असे सांगून प्रवासी महासंघाने त्याबद्दल खूप समाधान व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे बोर्ड अध्यक्ष, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, माजी खासदार आनंद परांजपे, खासदार राजन विचारे आदींचे आभार मानले.
वाढदिवस उत्साहात साजरा करण्याचा मानस
ठाणे स्थानकात नॅरोगेज इंजिन दाखल झाल्याने १६ एप्रिलला भारतीय रेल्वेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा मानस उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
-------------