जादा दराने सोने घेण्याच्या नावाखाली १९ लाखांची फसवणूक: ‘त्या’ भामटयाला होणार अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 09:23 PM2018-07-01T21:23:45+5:302018-07-01T21:30:19+5:30

राज्याच्या मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांचा नातेवाईक असल्याची बतावणी करीत वेगवेगळी अमिषे दाखवून लोकांना गंडा घालणाऱ्या गजानन पालवे विरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात आणखीही गुन्हे दाखल होत आहे. त्यामुळे त्याला नौपाडा पोलीस पुन्हा ताब्यात घेणार आहेत.

19 lakh cheating in the name of getting gold at a higher rate | जादा दराने सोने घेण्याच्या नावाखाली १९ लाखांची फसवणूक: ‘त्या’ भामटयाला होणार अटक

पोलीस अधिकारी असल्याचेही भासविले

Next
ठळक मुद्देमंत्री पंकजा मुंडे यांचा दीर असल्याची केली बतावणीसोन्याच्या नाण्यांची जादा भावात खरेदीपोलीस अधिकारी असल्याचेही भासविले

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: जादा दराने सोने घेण्याच्या नावाखाली ठाण्यातील काही सराफांना गंडा घालणा-या गजानन पालवे (४७, रा. घोडबंदर रोड, ठाणे, मुळ रा. बुलढाणा) याला नौपाडा पोलीस लवकरच पुन्हा ताब्यात घेणार आहेत. राज्याच्या महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दीर असल्याचीही त्याने अनेकांकडे बतावणी केली होती.
पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करीत ठाण्याच्या पाचपाखाडीतील म्हसे पाटील या वाहन खरेदी विक्री करणा-याला पाच लाख ६४ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी पालवेला पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने २१ जून २०१८ रोजी अटक केली होती. या प्रकरणात १ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असली तरी त्याला पुन्हा या फसवणूकीच्या गुन्हयात अटक केली जाणार आहे.
आधी वाहने खरेदीतून फसवणूक
पालवे याने आपण पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करीत पाचपाखाडीतील म्हसे पाटील यांना प्रत्येकी तीन लाख आणि दोन लाख ६४ हजार अशा पाच लाख ६४ हजारांमध्ये दोन वाहने विकली होती. नंतर याच वाहनांना चांगले गि-हाईक मिळाल्याचे सांगून त्याने ती वाहने पाटील यांच्याकडून घेतली. त्यांना पुन्हा वाहने किंवा पैसेही दिले नाही. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची नौपाडा पोलीस ठाण्यात २० जून रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर २२ जून रोजी त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान, ठाण्याच्या विजय बेंद्रे या सराफाकडूनही त्याने २२ एप्रिल २०१८ रोजी सोन्याची बिस्कीटे, नाणी आणि सोनसाखळी असे ५८० ग्रॅम ६४० मिली ग्रॅम वजनाचे १९ लाख ४० हजारांचे दागिने घेतले. त्याबदल्यात त्याने बेंद्रे यांना दिलेले १९ लाख ४० हजारांचे धनादेशही वटले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बेंद्रे यांनीही २२ जून रोजी पालवे विरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच गुन्हयात त्याला आता लवकरच अटक केली जाणार आहे.
पंकजा यांचा दीर असल्याची बतावणी
गजानन याने मंत्री पंकजा मुंडे पालवे यांचे पती अमित यांचा चुलत भाऊ असल्याचीही अनेकांना बतावणी केली होती. तसे त्याने काही पोलीस अधिका-यांनाही भासविले होते. त्यामुळे मंत्रालयातील काही कामे करण्याचेही तो अमिष दाखवायचा. वाडा येथील एका तरुणीचीही त्याने अशीच आर्थिक फसवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याविरुद्ध अशी अनेक प्रकरणे दाखल होत असून ज्याचा त्याने पंकजा यांचे पती अशी बतावणी केली होती. त्या अक्षय चौधरीलाही पोलिसांनी अटक केली आहे. ‘आपण अमित दादा बोलतोय, तुमचे काम करुन देतो,’ इतकेच बोलण्यासाठी पालवे त्याला थोडे फार पैसे द्यायचा. पण, त्याने लोकांची कशी फसवणूक केली? हे आपल्याला माहित नसल्याचे अक्षयने पोलिसांना सांगितले. पालवे या आडनाव साधर्म्य असल्याचाच गजानन याने गैरफायदा उचलत अनेकांना गंडा घातल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली.

Web Title: 19 lakh cheating in the name of getting gold at a higher rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.