ठेवीदारांच्या बनावट सह्या करून १९ लाखांचा अपहार, खजिनदाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:35 AM2018-08-13T03:35:31+5:302018-08-13T03:35:41+5:30
मुंबईतील रामचंद्र गुरव या खातेदाराने विश्वासाने ठेवलेल्या १९ लाख ३० हजारांच्या रकमेचा ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाणे - मुंबईतील रामचंद्र गुरव या खातेदाराने विश्वासाने ठेवलेल्या १९ लाख ३० हजारांच्या रकमेचा ठाण्याच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील व्यवस्थापक आणि खजिनदाराने अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खातेदाराची बचत खात्यातील रक्कम परस्पर ‘एफडी’मध्ये रूपांतरित करून त्यावर कर्ज घेण्याचा पराक्रम आरोपींनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खजिनदार दादासाहेब केसरे (२७) याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली.
गुरव यांनी १७ एप्रिल २०१७ रोजी त्यांची दोन्ही मुले, लहान भाऊ आणि त्याची पत्नी यांच्या विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या इंदिरानगर शाखेतील बचत खात्यात धनादेशाद्वारे १९ लाख ३० हजारांची रक्कम जमा केली होती. ही रक्कम दुसऱ्याच दिवशी, १८ एप्रिल रोजी पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश नलावडे आणि खजिनदार दादासाहेब केसरे यांनी आपसात संगनमत करून रामचंद्र गुरव यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, लहान भाऊ शंकर आणि त्यांची पत्नी यांच्यापैकी कुणाचीही लेखी परवानगी किंवा संमतीपत्र न घेताच त्यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या बचत खात्यातील रकमेची परस्पर एफडी (मुदत ठेव) केली. त्याच एफडीवर तारण कर्ज घेऊन ती रक्कम पुन्हा त्यांच्या बचत खात्यात जमा केली. आरोपी नलावडे आणि केसरे यांनी गुरव कुटुंबीयांच्या बनावट स्वाक्षºया करून १८ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१७ या मुदतीत पैसे काढून त्यांची १९ लाख ३० हजारांची फसवणूक केली. सुरुवातीला गुरव यांनी याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्याच्या चौकशीत या अपहाराचा प्रकार उघड झाल्याने याप्रकरणी अपहार, फसवणुकीचा गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात ११ आॅगस्ट रोजी दाखल केला. शनिवारी रात्री खजिनदार केसरेला अटक करण्यात आली असून प्रकाशलाही चौकशीनंतर अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रार
विशालदीप सहकारी पतसंस्थेच्या बचत खात्यात ठेवलेली १९ लाख ३० हजारांची रक्कम काढण्यासाठी रामचंद्र गुरव पतसंस्थेत गेले होते. या पतसंस्थेतून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यांनी कंटाळून याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या चौकशीतून हा अपहार उघड झाला. आरोपी खजिनदाराला अटक झाली असून त्याचा साथीदार शाखा व्यवस्थापक प्रकाश नलावडे यालाही चौकशीनंतर अटक केली जाणार आहे.
- सुलभा पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे