१९५३ गावांत आज सातबारा होणार आॅनलाइन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 02:16 AM2018-05-01T02:16:31+5:302018-05-01T02:16:31+5:30
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९५३ गावांतील शेतकऱ्यांना आॅनलाइन डिजिटल सातबारा देण्यात येणार आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील एक हजार ९५३ गावांतील शेतकऱ्यांना आॅनलाइन डिजिटल सातबारा देण्यात येणार आहे. या गावांपैकी अंबरनाथ तालुक्यातील बांदणवाडीतील शेतक-यांचे १०० टक्के डिजिटल सातबारा आॅनलाइन झाला असून त्यांच्या वितरणाचा प्रारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी होत आहे.
जिल्हाभरात सुमारे एक लाख ७० हजार ६५६ खातेदार शेतकरी आहेत. यामध्ये एक हेक्टरपर्यंतच्या अत्यल्प भूधारक शेतकºयांपासून ते दोन हेक्टरपर्यंतचे अल्पभूधारक, चार हेक्टरपर्यंतचे लघु, मध्यम, मध्यम भूधारक १० हेक्टरपर्यंत आणि मोठे शेतकरी १० हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकºयांचा जिल्ह्यात समावेश आहे. जिल्हाभरातील एक हजार ९५३ गावांमधील शेतजमिनींचे सातबारा आॅनलाइन डिजिटल करण्याचे काम काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे.
सद्य:स्थितीला १०० टक्के डिजिटल सातबारा अंबरनाथच्या बांदणवाडी या महसुली गावातील शेतजमिनीचे तयार झाल्याची माहिती या योजनेचे काम हाताळणारे उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी यांनी ‘लोकमत’ला दिली. या आॅनलाइन डिजिटल मोडच्या दृष्टीने एक हजार ९५३ महसुली गावांपैकी आतापर्यंत ८९८ गावांतील शेतजमिनीच्या डिजिटल सातबा-यांसाठी घोषणा प्रपत्र-३ पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित एक हजार ५५ गावांचे काम अर्धवट शिल्लक असल्याच्या वृत्तास वळवी यांनी दुजोरा दिला आहे. या योजनेच्या सातबारा वितरणास शुभारंभ होत असला, तरी १०० टक्के काम पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.
राज्यभर डिजिटल स्वाक्षरीनिशी सातबारा उपलब्ध होत असल्याच्या मुहूर्तावर ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांचा सातबारादेखील आजपासून आॅनलाइन देण्यास प्रारंभ होत आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात होणार आहे. या दिवशी एकाच वेळी राज्यभरातील अन्य जिल्ह्यांतही डिजिटल सातबारा आॅनलाइन उपलब्ध होणार आहेत.