मीरा भाईंदरमध्ये एकाच क्रमांकावर धावत होत्या २ रुग्णवाहिका; मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 07:17 PM2021-02-21T19:17:29+5:302021-02-21T19:18:21+5:30
मीरा भाईंदर मध्ये एकाच क्रमांकावर २ रुग्णवाहिका चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार काँग्रेस आघाडीतील नगरसेवक राजीव मेहरा यांनी उघडकीस आणला आहे .
मीरा भाईंदर मध्ये एकाच क्रमांकावर २ रुग्णवाहिका चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार काँग्रेस आघाडीतील नगरसेवक राजीव मेहरा यांनी उघडकीस आणला आहे . त्यांच्या तक्रारी नंतर मीरारोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे .
मीरारोडच्या शीतल नगर व साईबाबा नगर भागात मेडी केअर नावाने उभ्या राहणाऱ्या दोन रुग्णवाहिकांचे क्रमांक मात्र सारखेच असल्याचा प्रकार नगरसेवक राजीव मेहरा यांच्या निदर्शनास आला . त्यांनी सदर प्रकरणी माहिती घेण्यास सुरवात केली. वाहन ऍप वर सदर क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे फिटनेस प्रमाण पत्र देखील २७ डिसेम्बर २०१३ रोजी पर्यंतच असल्याचे आढळून आले .
वाहन फिटनेस प्रमाणपत्र नाही आणि एकाच क्रमांकावर दोन रुग्णवाहिका चालवण्याचा हा वैद्यकीय सेवेच्या नावाखाली चालणारा काळा धंदा उघडकीस आणून मेहरा यांनी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते याना लेखी तक्रार करत डॉ . अशोक चोमल व संबंधितांवर कारवाईची मागणी केली . या शिवाय मेहरा यांनी अन्य ३ रुग्णवाहिकांचे क्रमांक देखील दिले ज्यांचे ऍप वर आरसी बुकच दाखवत नव्हते .
पोलीस आयुक्तांच्या निर्देशा नंतर मेडिकेअर नावाच्या एम एच ०४ एफजे ३४८८ ह्या एकाच क्रमांकाच्या २ रुग्णवाहिका वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी उपनिरीक्षक एम . जी . पाटील सह मनीष शिंदे आदी पोलिसांचे एक पथक बनवले . सदर पथकाने ह्या दोन्ही रुग्णवाहिका ताब्यात घेतल्या .
सदर दोन्ही रुग्णवाहिका जप्त करून मीरारोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी रुग्णवाहिका मालक चोमल आदीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका रुग्णवाहिकेची कागदपत्रे बनावट असल्याची तसेच एका चालका कडे बनावट वाहन परवाना आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .
भाईंदर:- मिरारोडच्या शीतल नगर व साईबाबा नगर येथील येथे एक भयानक व भन्नाट प्रकार समोर आला आहे त्यात एकाच नंबरच्या व सारख्या दिसणाऱ्या दोन अंबुलन्स एका स्थानिक नगरसेवक यांच्या तक्रारीवरून वाहतूक विभागांनी शोधून त्यांच्यावर मिरारोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
वैद्यकीय सेवेत वापरल्या जाणाऱ्या ह्या एकाच क्रमांका वरींल फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या रुग्णवाहिका घोटाळ्या मुळे खळबळ उडाली आहे . रुग्णांच्या जीवाशी खेळ चालवला जात असल्याच्या ह्या प्रकाराने शहरातील रुग्णवाहिकांची कठोर पडताळणी करण्याची मागणी होत आहे . या आधी पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाडयांचे फिटनेस प्रमाणपत्र नसल्या सह अनेक गंभीर बाबी समोर येऊन देखील प्रादेशिक परिवहन व वाहतूक पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे .