३४ कोटींची नुकसानभरपाई; ७७ हजार शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:33 PM2019-11-17T23:33:49+5:302019-11-17T23:33:52+5:30
नुकसानीच्या तुलनेत भरपाई कमी असल्याने बळीराजा नाराज
- सुरेश लोखंडे
ठाणे : अवेळी पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात ४२ हजार ४२६.३१ हेक्टर शेतातील मालाचे नुकसान झाले असून, त्यापोटी सुमारे ३४ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेक्टरी आठ हजार रुपयांप्रमाणे ही भरपाई देण्याचा निर्णय सध्याच्या राष्ट्रपती राजवटीतील प्रशासनाने घेतला. या नुकसानभरपाईचा लाभ जिल्ह्यातील ७७ हजार १२८ शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, ही भरपाई फारच कमी असल्याचा सूर जिल्ह्यातील शेतकºयांमधून उमटत आहे.
‘शेतकरी २९ कोटींच्या भरपाईच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली लोकमतने १५ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून शेतकºयांच्या दयनीय अवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने जिल्ह्यातील ७७ हजार शेतकºयांच्या ४२ हजार ४२६ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांचा निकष निश्चित केला होता. त्यानुसार, २८ कोटी ८४ लाख ९९ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यामार्फत कृषी विभागाने शासनास दिला होता. त्यानुसार, जिल्ह्यातील ७७ हजार १२८ शेतकºयांना ३३ कोटी ९४ लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या भरपाईची रक्कम महसूल विभागाद्वारे वाटप होणार की, थेट शेतकºयांच्या खात्यात जमा होणार, याबाबत अद्याप सुस्पष्टता नाही.
अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे प्रशासनाने युद्धपातळीवर केले. मात्र, भरपाई लागू करण्याचा निर्णय गुलदस्त्यात होता. राष्टÑपती राजवटीमुळे यास विलंब होत असल्याने शेतकºयांमध्ये संताप होता. अखेर, शनिवारी हेक्टरी सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाईच्या जुन्या अध्यादेशात एक हजार २०० रुपयांची वाढ करून हेक्टरी आठ हजार रुपयांप्रमाणे शेतकºयांना भरपाई लागू झाली आहे. या नुकसानभरपाईच्या वाटपाबाबत मार्गदर्शक सूचना आलेल्या नाही. कदाचित, सोमवारपर्यंत त्या येतील. जिल्ह्यातील ४२ हजार हेक्टरवरील पंचनामे झालेले आहे. भरपाईची रक्कम बँकेत जमा होण्याची शक्यता जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केली.
हेक्टरी २०/२५ हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत होऊन भरीव नुकसानभरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ एक हजार २०० रुपयांची वाढ झाल्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यातील भातपिकाच्या नुकसानीपोटी सुमारे ३३ कोटी ८० लाख ९६ हजार रुपये शेतकºयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागलीच्या १२७ हेक्टरवरील नुकसानीसाठी १० लाख १६ हजार आणि वरी पिकाच्या ३७ हेक्टरच्या नुकसानीसाठी दोन लाख ९६ हजार रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे.
सर्वाधिक भरपाई भिवंडी तालुक्याला
भिवंडी तालुक्यातील सर्वाधिक १९ हजार ४५० शेतकºयांचे नुकसान झाले. त्यांच्या १५ हजार ६८० हेक्टरवरील पिकास १२ कोटी ५४ लाख ४० हजारांची भरपाई अपेक्षित आहे. शहापूर तालुक्यातील ११ हजार ७७६.६७ हेक्टरवरील नुकसान झालेल्या २४ हजार १९० शेतकºयांना नऊ कोटी ४२ लाख १३ हजार रुपये, तर मुरबाड तालुक्यातील १८ हजार ७२६ शेतकºयांना १० हजार २४९ हेक्टरवरील पिकांसाठी आठ कोटी १९ लाख ९२ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळणे शक्य आहे. कल्याण तालुक्यातील सात हजार ६५ शेतकºयांना एक हजार ५७९ हेक्टरच्या नुकसानीपोटी एक कोटी २६ लाख ३२ हजार रुपये, तर अंबरनाथ तालुक्यातील सात हजार शेतकºयांना दोन हजार ९५० हेक्टरच्या नुकसानीसाठी दोन कोटी ३६ लाख रुपये आणि ठाणे तालुक्यामधील ६९७ शेतकºयांना १९१.६० हेक्टरकरिता १५ लाख ३२ हजार रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.