नांदिवलीत २ कोटींचे रस्ते, नाल्याची काम होणार तरी कधी? - रवी म्हात्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 08:26 PM2019-08-07T20:26:13+5:302019-08-07T20:26:39+5:30
नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ नगरमध्ये पुराच्या पाण्यामुळे बोट घेऊन दोन रुग्णांसह अन्य रहिवाश्यांना मदत करावी लागली.
डोंबिवली: नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ नगरमध्ये पुराच्या पाण्यामुळे बोट घेऊन दोन रुग्णांसह अन्य रहिवाश्यांना मदत करावी लागली. अनेकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी गेले. आयुष्यभराची पुंजी जमवून सर्वसामान्य नागरिक घर घेतात, आणि अशा पद्धतीने महापालिका प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे नागरिकांचे नुकसान होते, ते योग्य नाही. नांदिवली भागात जेथे पाणी साचते त्या भागात चांगला रस्ता होण्यासाठी,आणखी एक नाला अशा विकासकामांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात २ कोटींची विकास कामे या प्रभागासाठी जाहिर झाली आहेत, पण कामांचा मात्र पत्त नाही. नागरिकांचे नुकसान झाल्यानंतरच विकास काम करायची का? महापालिका प्रशासनाची ही कामाची पद्धत कुठली? अशी टिका करत नांदिवलीचे माजी सरपंच रवी म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली.
रविवारी त्यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासमवेत श्री स्वामी समर्थ मठासमोरील गळया एवढ्या पाण्यामधून मदत कार्य देण्यास अडचणी येत असल्याचे अनुभवले. अखेरीस त्यांनी बोट मागवून नागरिकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ७ वाजल्यापासून पाणी कमी होत नसल्याने अखेरीस ११ नंतर बोटीने त्यांनी ज्या नागरिकांना बाहेर यायचे होते त्यांना बाहेर काढले. तसेच रुग्णांनाही बाहेर काढले.
नगरसेविका, ई प्रभाग समिती सभापती रुपाली रवी म्हात्रे यांच्या प्रभागात रस्ते, नाले आदी विकासकामांसाठी २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा आराखडा देखिल तयार करण्यात आला असून कामाला सुरुवात का केली नाही? मार्च महिन्यापासून या ठिकाणी कामे व्हावीत यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. प्रत्यक्षात अधिका-यांना भेट, पाहणी करण्यात आली. परंतू तरीही कामे मात्र पुढे सरकली नाहीत त्यामुळेच यंदाही पूरस्थितीतून नागरिकांना जावे लागत असल्याचे म्हात्रे म्हणाले.
गतवर्षी आणि यंदाही आयुक्त गोविंद बोडके यांनी येथील पाणी बघून गंभीर स्थिती असल्याचे सांगत पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने त्यांनीच तातडीने जेसीबी बोलावून दोन इमारतींच्या भिंती पाडण्याचे आदेश दिल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली होती. जेथे पाणी साचले होते तो भाग सखल असून २००५ च्या पूरामध्येही इथला भाग पाण्याखालीच होता. त्यावेळी स्वामींच्या मठातील सभामंडपाला पाणी लागले होते,ध्यानमंदिर पूर्ण पाण्याखाली होते. तेव्हापासून या ठिकाणच्या रस्त्याची विशेष काम झालेली नव्हती. आता महापालिकेत आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला, पण पुन्हा स्थिती जैसे थेच असल्याने त्यांच्या घरांचे, सामानाचे, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. जे झाले ते झाले पण आता तरी महापालिकेने या प्रभागातील रस्ते, नाले यांसह मुलभूत काम तातडीने करावीत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी म्हात्रे यांनी केली. पुढील वर्षी तरी अशी गंभीर स्थिती नसावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयुक्त सकारात्मक असले तरी अधिकारी मात्र कामात दिरंगाई, दुर्लक्षपणा करत असल्यामुळेच प्रभागातील विकास काम संथगतीने सुरु असल्याची टिका म्हात्रेंनी केली.