भिवंडीतील 6 महिन्यांच्या बाळाची केलेली 2 लाखांत विक्री; झारखंड येथून बाळाची सुखरूप सुटका
By नितीन पंडित | Published: May 1, 2023 04:32 PM2023-05-01T16:32:23+5:302023-05-01T16:33:05+5:30
बाळ परत मिळाल्याने मुलाच्या आई वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.
भिवंडी: सहा महिन्याच्या मुलाचे अपहरण करून त्याची झारखंड येथे दोन लाख रुपयात विक्री करणाऱ्या त्रिकुटास शांतीनगर पोलिसांनी भिवंडी व झारखंड येथून मोठ्या शिताफीने अटक करत अपहरण झालेल्या बालकास आईकडे सुखरूप सोपविले असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सोमवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी बाळ परत मिळाल्याने मुलाच्या आई वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.
शांतीनगर न्यू आझाद नगर येथील झोपडपट्टीत राहणारी महिला शहाना अन्सारी हिने १४ एप्रिल रोजी आपल्या सहा महिन्यांच्या अरबाज यास शेजारी राहणारी मैत्रीण फातिमा हिच्या घरी झोपवून रमजानच्या खरेदी साठी सकाळी गेली होती. दुपारी खरेदी करून घरी पोहचल्यावर अरबाज तेथे नव्हता.परिसरात शोध घेवूनही तो सापडला नसल्याने शांतीनगर पोलिस ठाण्यात मुलाचे वडील शाहबाज मोहमद अन्सारी यांनी तक्रार दिली होती.घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक बनवून शोध घेण्यास सुरुवात केली होती.
सपोनि शैलेंद्र म्हात्रे,पोलीस हवालदार महेश चौधरी,रवि पाटील,अनिल शिरसाठ,महिला पोलिस हवालदार मनाली फर्डे,पोलिस नाईक श्रीकांत पाटील, किरण जाधव,पोलिस शिपाई रविंद्र पाटील,नरसिंह क्षीरसागर,विजय ताटे या पोलिस पथकाने परिसरातील काहीं व्यक्तींकडून माहिती घेत सीसीटिव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे सुरुवातीला भिवंडी शहरात फुटपाथवर कपडे विकणाऱ्या अफरोज अबुबकर शेख वय २५ रा.शांतीनगर यास ताब्यात घेतले.त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने अपहरणाची कबुली देत बाळाला शंभु सोनाराम साव वय ५० वर्षे रा. येवईनाका,भिवंडी या मार्फत विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले.शंभू झारखंड येथे पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच कल्याण रेल्वे स्थानकातून शंभू यास शांतीनगर पोलिसांनी अटक केली.
गुन्हयाचा सखोल तपास सुरू केला असता अपहरण केलेल्या मुलास झारखंड राज्यातील ओळखीची महिला मंजुदेवी महेश साव वय ३४ वर्षे रा.जितकुंडी ता.बेको, ठाणा बिरनी, जि.गिरडी या महिलेस दोन लाख रुपयांना मुलाला विक्री केल्याची कबुली दिली.ही माहिती मिळाल्या नंतर सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथक झारखंड राज्यात धडकले. महिलेचे वास्तव्य ठिकाण हे रांची पासून दोनशे किमी अंतरावर नक्षलग्रस्त क्षेत्र असल्याने स्थानिक सशस्त्र पोलिसांच्या मदतीने बाळाला विकत घेणारी महिला आरोपी मंजुदेवी महेश साव हिस मुलासह ताब्यात घेतले.सोमवारी या बाळाला पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी आई शहाना अन्सारी हिच्याकडे सोपविले.
पोलीस पथकास रोख पारितोषिक
पोलीस पथकाने उत्तम कामगिरी करीत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अफरोज अबुबकर शेख,शंभु सोनाराम साव,मंजुदेवी महेश साव या तिघांना अटक केल्याने पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर व पोलिस पथकातील सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करीत त्यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.
पोलिसांनी माझा आनंद पुन्हा मिळवून दिला, आईने मानले पोलिसांचे आभार
माझे बाळ हरविल्यानंतर १५ दिवस ते माझ्या पासून दूर होते,मला माझा अरबाज परत मिळेल ही आशा देखील मी सोडून दिली होती.मात्र शांतीनगर पोलिसांनी प्रत्येक वेळी मला धीर देत माझे बाळ शोधून आज माझ्या हाती सोपवले.पोलिसांनी माझा आनंद मला परत मिळवून दिला आहे,भिवंडी पोलिसांचे आमच्यावर लाख लाख उपकार असून त्यांचे मनापासून आभार मानते अशी भावनिक प्रतिक्रिया अपहरण झालेल्या चिमुरड्या अरबाजची आई शहाना अन्सारी हिने दिली असून पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.