एनडीआरएफकडून ३० तरुण-तरुणींना धडे; आठवड्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:27 AM2019-09-11T00:27:59+5:302019-09-11T00:28:21+5:30
आपत्ती निवारणासाठी जिल्ह्यातील पाच पथके तयार
ठाणे : आपत्ती कालावधीत बचाव करण्यासाठी व संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी उल्हासनगर येथील तब्बल ३० तरुण-तरुणांना आपत्ती निवारणाचे एक आठवड्याचे प्रशिक्षण दिले. यानंतर, शहापूर येथील पथकास प्रशिक्षण पुणे येथे दिले जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून पाच पथके तयार केली आहेत. यामध्ये उल्हासनगर येथील तरुणांच्या पथकाचे प्रशिक्षण पूर्ण झाले. शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण येथील पथकांची या प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. प्रत्येक पथकात ३० जणांचा समावेश आहे. उल्हासनगर वगळता कोणत्याही पथकात मुली नाहीत. उल्हासनगरमधील पथकात १२ मुली आहेत. उल्हासनगरनंतर शहापूरच्या पथकास पुणे येथे प्रशिक्षणास पाठवले जाणार आहे.
आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. सध्या ठिकठिकाणी भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, अपघात अशा आपत्तींवर मात करण्याच्या दृष्टीने सामाजिक बांधीलकीच्या तरुणांची प्रशिक्षणासाठी योग्यता पाहून निवड करण्यात आली.
उल्हासनगरच्या या ३० युवकयुवतींनी पुणे येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अंतर्गत ठाणे येथील नेहरू युवा केंद्र्रे, यूएनडीपी, यूएनव्ही इंडिया यांच्या सहकार्याने सहा दिवसांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले. नेहरू युवा केंद्र ठाणेच्या जिल्हा युवा समन्वयक हिंदप्रभा कर्वे यांनी उल्हासनगर या ३० युवक व युवतींची या प्रशिक्षणासाठी निवड करून त्यांना यावेळी एनडीआरएफच्या जवानांनी प्राथमिक उपचारपद्धतीचीही माहिती सांगितली. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या युवकयुवतींना प्रमाणपत्रांचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यात आपद्ग्रस्तांना मदत करण्याचे अवर्णनीय समाधान आम्हाला मिळणार असल्याचे प्रशिक्षणार्थी व्यंकटेश वेमुगांटी यांनी सांगितले.