भामट्यांकडून ५३ एमटीएम कार्ड्स जप्त, राज्यभरात अनेक ठिकाणी फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:18 AM2020-01-30T01:18:28+5:302020-01-30T01:18:39+5:30
ठाण्यातील दहिसर येथील रहिवासी शंभुनाथ योगी हे १७ आॅक्टोबर २०१८ रोजी एटीएममधून रोकड काढण्यासाठी गेले होते.
ठाणे : एटीएम केंद्रांमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने राज्यभरातील बँक खातेदारांची वेगवेगळ्या ठिकाणांहून फसवणूक करणाऱ्या श्रीकांत गोडबोले (२५, रा. मलंग रोड, कल्याण, ठाणे) आणि प्रवीण साबळे (२२, रा. माळेगाव, एमआयडीसी, सिन्नर, जि. नाशिक) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे ५३ एटीएमकार्ड जप्त केली आहेत.
ठाण्यातील दहिसर येथील रहिवासी शंभुनाथ योगी हे १७ आॅक्टोबर २०१८ रोजी एटीएममधून रोकड काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका भामट्याने त्यांना पैसे काढून देण्याचा बहाणा करून त्यांच्या एटीएमकार्डच्या आधारे २९ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात १८ आॅक्टोबर २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे पोलीस नाईक संजय बाबर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे आणि संदीप बागुल यांच्या पथकाने ११ जानेवारी २०२० रोजी नाशिक एमआयडीसीतून दोघांना अटक केली.
आरोपींविरुद्ध यापूर्वीही बदलापूर, वाशी, धुळे, पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत. हे दोघेही एटीएम केंद्रामध्ये येणाºया वयोवृद्धांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएमकार्ड मिळवून त्याआधारे पैसे काढून घेत असत. त्यांनी अशा प्रकारे १०० पेक्षा जास्त फसवणुकीचे प्रकार केल्याची शक्यता असून त्यांनी आणखी कोणाची फसवणूक केली. तसेच त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.