पालघरमध्ये ६७० जणांना वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:53 AM2019-08-05T03:53:49+5:302019-08-05T03:54:06+5:30

अतिवृष्टीमुळे पूल खचले; एनडीआरएफ, कोस्टगार्ड जवानांची कामगिरी

2 rescued in Palghar | पालघरमध्ये ६७० जणांना वाचविले

पालघरमध्ये ६७० जणांना वाचविले

Next

पालघर : जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील पूल खचल्याने आणि पाणी साचून राहिल्याने ठिकठिकाणी अडकलेल्या ६७० लोकांची सुखरूप सुटका एनडीआरएफ आणि कोस्टगार्डच्या जवानांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे स्वत: आपल्या विविध टीमसह घटनास्थळी जाऊन मदतकार्याचा आढावा घेत आहेत.

मुसळधार पाऊस, समुद्राला आलेली मोठी भरती, त्यातच विविध धरणांतून पाण्याचा होणारा विसर्ग अशा तिहेरी संकटाचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे घराबाहेर पडलेले हजारो नागरिक आपल्या घराकडे जाताना मध्येच अडकून पडल्याच्या घटना घडल्या. वाडा तालुक्यातील केलटन भागात पाणी शिरल्याने ४० जण अडकले. मनोर (टेण)-वाडा रस्त्यावरील करळगाव येथे ४, वसई तालुक्यातील राजोडीमधून ३००, मोरीगावातून १८९, भाताणे १०, नवघर (पूर्व) मिठागर भागातील ४७, अर्नाळामधून ८८ अशा पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण ६७० जणांच्या सुखरूप सुटकेसाठी एनडीआरएफ आणि कोस्टगार्डच्या जवानांनी अथक परिश्रम घेतले. या सर्व घडामोडींकडे जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन जातीने लक्ष देत आहेत.

वैतरणा खाडीच्या मध्ये असणारे वाढीव गाव शनिवारपासून पाण्याखाली असून गुडघाभर पाणी प्रत्येक घरात आहे. दोन दिवस हे गाव अंधारात असून एकाही घरात शनिवारपासून चूल पेटलेली नाही. याच गावातील बेबी बाई भोईर या ६० वर्षीय महिला १ आॅगस्ट रोजी वैतरणा पुलावरून खाडीच्या पाण्यात पडल्या असून आजपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण नगावकर यांच्याशी संपर्कसाधून अंधारात वनचरांचा धोका पाहता वीजपुरवठा करण्याबाबत त्यांना कळविण्यात आले आहे.

वसईत ४०० जणांना वाचवले
वसई पूर्वेस असलेली मिठागर वसाहत या परिसरात साधारण ४०० जण अडकले होते. त्या सर्वांना वसई तहसीलदार, महापालिका, अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
वसई पूर्वेस मोरी, सारजा मोरी, कामण आदी गावे आहेत. मात्र येथे दोन नद्यांची पात्रे असून या भागात साधारणपणे २०० जण राहतात. रविवारी या ठिकाणी ७० ते ८० ग्रामस्थ अडकून बसले होते. त्यांच्या मदतीसाठी तहसीलदार व जिल्हा आपत्कालीन यंत्रणेने एनडीआरएफची टीम बोलावली. त्यांना बोटीतून सुरक्षितस्थळी आणले असून बचावकार्य सुरू आहे.

जनावरे गेली वाहून
वाडा तालुक्यातील गांध्रे येथे वैतरणा नदीजवळ प्रभाकर भोईर (४० म्हशी), अरुण ठाकरे (१० म्हशी), विवेक ठाकरे (३ जर्शी
गाई) यांचे तबेले होते. वैतरणा नदीला आलेल्या महापुरात या तबेल्यांत पाणी जाऊन काही जनावरे वाहून गेली, तर काही पुराच्या पाण्यात अडकली आहेत. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी दोरीच्या मदतीने येथील सहा कामगारांना पुराच्या पाण्यातून सुखरूप काढले आहे.

Web Title: 2 rescued in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस