ठाण्यासह मुंबईकरांसाठी ५५७ ट्रक भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:15 AM2019-07-26T00:15:08+5:302019-07-26T00:16:08+5:30
आवक पुरेशी : पावसाच्या नावाखाली ग्राहकांची लूट
सुरेश लोखंडे
ठाणे : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह अन्यही ठिकाणी भाजीपाला, कांदे, बटाटे, फळे आणि अन्नधान्य आदींचा ५५७ ट्रक माल आजही आलेला आहे. ठाणेकरांसह मुंबईतील ग्राहकांना हा भाजीपाला पूरक आहे. पण, पावसाचे निमित्त करून भाजी मंडईत व बाजारात ग्राहकांना चढ्या भावात भाजीपाल्याची विक्री करत दुकानदार नाहक लूट करीत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.
बुधवारी आणि गुरुवारी मुंबई, ठाण्यात धोधो पाऊस पडला. तरीदेखील गुरुवारी सकाळी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह कल्याणच्या बाजार समितीत ५५७ ट्रक पालेभाज्यांसह कांदा, बटाटा, अन्नधान्य, फळे, फुले आणि टोमॅटोंचा पुरवठा झाला आहे. अन्य काही दिवसांच्या तुलनेत काही अंशी जास्तच भाजीपाला या बाजार समित्यांमध्ये येत आहे. परंतु ठाणे, मुंबईतील पावसाचे कारण पुढे करून ग्राहकांची मनमानी लूट करीत चढ्या दराने भाजीपाला विकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
ठाणे, मुंबई, पालघर हे कोकणचे जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांत पाऊस नाही. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतातून निघत असलेल्या भाजीपाल्याच्या उत्पन्नावर शेतकरी कसेबसे तग धरून आहेत. यामुळे ठाणे, मुंबईच्या बाजार समित्यांमध्ये भाजीपाला, अन्नधान्यही मोठ्या प्रमाणात येत आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी भाजीपाला काढून बाजारात आणत आहेत. शेतात चिखल नसल्यामुळे वाहनेही जात आहेत. पण, ग्राहकांची दिशाभूल करून त्यांना चढ्या दराने भाजीपाला विकला जात आहे. पाऊस पडत असल्यामुळे शेतात वाहन जात नाही. मोठ्या कष्टाने काही ट्रक बाजारात आणले जात आहेत. यामुळे ट्रकचालक पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहता, त्यानुसार माल उतरवत असल्यामुळे भाजीपाला महागल्याचे दुकानदार सांगत आहेत. व्यापारी आणि दुकानदारांकडून लूट होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबई बाजार समितीमध्ये ४८२ ट्रक अन्नधान्य, भाजीपाला
सर्वाधिक मोठ्या नवी मुंबई बाजारपेठेत ८९ ट्रक व ५०२ टेम्पो भाजीपाला गुरुवारी सकाळी आला. त्याचप्रमाणे अन्नधान्यासह कडधान्याचे १६८ ट्रक, ८० टेम्पोची आवक झालेली आहे. याशिवाय, ५६ ट्रक व २१८ ट्रेम्पोद्वारे फळे, तर ९५ ट्रक व ३६ टेम्पोद्वारे कांदा -बटाटा आणण्यात आलेला आहे. मसाल्याची वाहतूक ७४ ट्रक व १२९ टेम्पोद्वारे झालेली आहे. कल्याण बाजार समितीमध्येदेखील २३ ट्रक व ६८ टेम्पो भाजीपाला, तीन ट्रक फळे, १३ ट्रक आणि तीन टेम्पो कांदे-बटाटे, तर २६ टेम्पोने फुले आणण्यात आलेली आहेत. टोमॅटो पाच ट्रक आणि १२ टेम्पोतून आणण्यात आले आहेत.