बिबट्यावर २० सीसीटीव्हींचा वॉच, आठ ते दहा बकºया, दोन गायी केल्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:21 AM2017-11-07T00:21:29+5:302017-11-07T00:21:41+5:30
मुरबाड, टोकावडे आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून दहशत पसरवणाºया बिबट्याला हेरण्यासाठी ठाणे वन विभागामार्फत या भागात तब्बल
ठाणे : मुरबाड, टोकावडे आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही दिवसांपासून दहशत पसरवणाºया बिबट्याला हेरण्यासाठी ठाणे वन विभागामार्फत या भागात तब्बल २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यामार्फत त्याच्या हालचाली टिपण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार, दोन कॅमेºयांत सध्या त्याच्या हालचाली दिसून आल्या आहेत. यातूनच स्थानिक पोलीस, वन विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या टीम तयार करून त्यामार्फतदेखील त्याचा मागोवा घेतला जात आहे. याशिवाय, येथील रहिवाशांमध्ये जनजागृतीचे कामही केले जात असल्याची माहिती ठाणे वन विभागाने दिली.
२६ आॅक्टोबरपासून बिबट्याने मुरबाड तालुक्यात आपली दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. मागील १५ दिवसांत त्याने तीन हल्ले करून आठ ते दहा बकºया आणि दोन गायी फस्त केल्या आहे. त्यामुळे येथील पाळीव प्राणी धोक्यात आले आहेत. सुदैवाने मागील वर्षी ज्या पद्धतीने बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता, तशी सध्या परिस्थिती ओढवलेली नाही. परंतु, तशी परिस्थिती येऊच नये, यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेतल्याची माहिती ठाणे वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. सध्या येथे कापणीचा मोसम सुरू असल्याने शेतकरी एकटादुकटा घराबाहेर निघत आहे. परंतु, त्याने एकट्याने न जाता सोबत दोघातिघांना घेऊन जावे, रात्रीचे खेकडे पकडणे बंद करावे. मुक्या प्राण्यांना बाहेर बांधू नये. लहान मुलांना सायंकाळनंतर बाहेर सोडू नये, यासह इतर जनजागृतीच्या उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी या भागात विविध ठिकाणी २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यानुसार, दोन कॅमेºयांत सध्या त्याच्या हालचाली दिसून आल्या आहेत. यातूनच त्यांनी आता त्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या कॅमेºयांमधील बिबट्याचे चित्रीकरण तपासून त्याआधारे तो नरभक्षक झाला आहे का, याचाही अभ्यास सुरू आहे. या अभ्यासानंतर त्या त्याच्यासंदर्भातील पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, वन विभागाचे अधिकारी, तहसीलदार, पोलीस, स्वयंसेवी संस्था यांची एक कमिटीदेखील या कामी स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. तर, वन विभागाचे पथक आणि सामाजिक संस्थामार्फत त्याला शोधण्याचे काम सुरू आहे.