जिल्ह्यात कोरोनामुळे २० बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:28 AM2021-06-05T04:28:28+5:302021-06-05T04:28:28+5:30
ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात ० ते १५ वर्षे वयोगटातील ३४ हजार ७८० मुलांना जणांना संसर्ग ...
ठाणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात ० ते १५ वर्षे वयोगटातील ३४ हजार ७८० मुलांना जणांना संसर्ग झाला होता. तर, २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यातही पहिल्या लाटेत १८ जणांचा तर दुसऱ्या लाटेत अवघ्या दोन जणांचा मृत्यू झाला होता.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा तसेच ठाणे महापालिकेनेही लहान मुलांसाठी १०० बेड तयार केले आहेत. शिवाय बालरोग तज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांची फळी उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली. ती जवळजवळ जानेवारी पर्यंत सुरू होती. तर फेब्रुवारी २०२१ नंतर दुसरी लाट आली. मात्र, आता ही लाट ओसरू लागली आहे. परंतु, आतापर्यंत जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ४९० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील ५ लाख १ हजार ६१३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे नऊ हजार ४०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ७ हजार ४६८ जणांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. तर, दुसऱ्या लाटेत तरुणांना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु, मृत्यूचे प्रमाण हे कमी आढळले आहे.
दुसरीकडे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ० ते १५ वर्ष वयोगटांतील ३४ हजार ७८० मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कमी असले तरीदेखील काही अंशी लहान मुलांनाही कोरोनाची झळ बसल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्या लाटेत १८ हजार ८९९ जणांना, तर दुसऱ्या लाटेत १५ हजार ८८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पहिल्या लाटेत १८ जणांचा तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आता तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकणार असल्याचे सांगितले जात असल्याने त्यांची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
---------------