विविध विकासकामांची २० कोटींची बिले थकीत; अंबरनाथ पालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 12:11 AM2020-11-08T00:11:57+5:302020-11-08T00:12:02+5:30
कोविडवर खर्च केल्याने निधीच शिल्लक नाही, प्रशासन झाले हतबल
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने शहर विकासाच्या अनुषंगाने सुरू केलेल्या कामांची बिले देण्यासाठी पालिकेकडे निधी शिल्लक नाही. विकासकामांची २० कोटींची बिले थकली आहेत. सर्व निधी कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च झाल्याने शहर विकासाच्या कामांची बिले देण्यासाठी निधी नसल्याने कंत्राटदारांनी कामे संथगतीने सुरू ठेवली आहेत. भविष्यातील कामांसाठीही निधी शिल्लक नसल्याने नवीन कामांना सुरुवात झालेली नाही. कोरोनामुळे पालिकेची आर्थिककोंडी झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे.
अंबरनाथ नगरपालिका सध्या आर्थिक कोंडीचा सामना करत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनावरील खर्च अफाट झाल्याने आता त्याचा थेट परिणाम हा पालिकेच्या कामकाजावर होत आहे. आपत्कालीन परिस्थिती असल्याने पालिकेने कोणताही विचार न करता कोरोना नियंत्रणाला प्राधान्य दिले होते. त्यामुळे शहरातील इतर कामांच्या बाबतीत आता आर्थिककोंडी झाली आहे. सरकारकडून हवी तशी आर्थिक मदत कोरोनासाठी न झाल्याने पालिकेने सर्व विकासकामांचा निधी हा कोरोनावर खर्च केला.
आता हा खर्च एवढा वाढला आहे की, पालिकेला आता त्यांच्याकडे आलेले बिल कसे द्यायचे, हा प्रश्न पडला आहे. बिलांसोबतच पालिकेच्या कर्मचा-यांसाठी येणारे सरकारी अनुदानही कमी झाल्याने त्या कर्मचा-यांच्या पगारामधील तफावत असलेली रक्कम कुठून आणावी, हा प्रश्न पडला आहे. तर, दुसरीकडे शहरातील काँक्रिट रस्त्यांसह इतर विकासकामांच्या बाबतीतही तीच अवस्था आहे.
या विकासकामांचे बिल देण्यासाठी पालिकेकडे निधी शिल्लक नसल्याने कंत्राटदारांची कोंडी झाली आहे. बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांनी इतर विकासकामे संथगतीने सुरू ठेवली आहेत.