उल्हासनगरातील ट्रान्झिट कॅम्पसाठी २० कोटी! आपत्कालीन परिस्थितीसाठी आयुक्त अजीज शेख यांच्याकडून पाहणी
By सदानंद नाईक | Published: May 3, 2023 07:29 PM2023-05-03T19:29:09+5:302023-05-03T19:29:24+5:30
महापालिकेला ट्रान्झिट कॅम्पसाठी शासनाने २० कोटीच्या निधीला मंजुरी दिली.
उल्हासनगर : महापालिकेला ट्रान्झिट कॅम्पसाठी शासनाने २० कोटीच्या निधीला मंजुरी दिली. मात्र पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, नागरिकांच्या सोयीसाठी भिवंडी आमंत्रण इमारतीची आयुक्त अजीज शेख यांच्याकडून पाहणी केली आहे.
उल्हासनगरात धोकादायक इमारती कोसळण्याचे सत्र सुरू असून इमारती मधील बाधित नागरिकांना राहण्याची महापालिकेकडे कोणतीही सुविधा नाही. आपत्कालीन परिस्थितीत बाधीत नागरिकांना राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने २० कोटीचा निधी ट्रान्झिट कॅम्पसाठी मंजूर केला. अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. लवकरच तात्पुरता निवारा केंद्र बांधण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थितीतील बाधित नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पावसाळ्यापूर्वी आपत्कालीन परिस्थिती पूर्वतयारी म्हणून भिवंडी येथील आमंत्रण इमारतीची पाहणी आयुक्त अजीज शेख व आपत्कालीन व अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी केली. कोरोना काळात भिवंडी येथील आमंत्रण इमारतीत कोरोना बाधित रुग्णांना ठेवण्यात आले होते. आता शहरातील आपत्कालीन परिस्थिती वेळी या इमारतीत बाधित नागरिकांना ठेवण्यात येणार आहे. तसेच एका वर्षात ट्रान्झिट कॅम्प उभा राहणार असल्याची माहिती आयुक्त शेख याची दिली आहे.