वीजबिल कमी करण्याच्या नावाखाली २६ ग्राहकांना २० लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:12 PM2021-10-13T23:12:16+5:302021-10-13T23:33:40+5:30
वीजबिल कमी करू देण्याच्या नावाखाली टोरंट कंपनीच्या ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील रफिक शेख (रा. मुंब्रा, ठाणे) आणि अब्दुल्ला शेख (रा. अमृतनगर, ठाणे) या दोन म्होरक्यांना डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वीजबिल कमी करू देण्याच्या नावाखाली टोरंट कंपनीच्या ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील रफिक शेख (रा. मुंब्रा, ठाणे) आणि अब्दुल्ला शेख (रा. अमृतनगर, ठाणे) या दोन म्होरक्यांना डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. त्यांनी अशाप्रकारे २६ ग्राहकांकडून १९ लाख ९१ हजारांची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे.
टोरंट पॉवर कंपनीचा डायघर भागात बिल भरणा केंद्र आहे. अलीकडच्या काळात वीजबिल भरताना एक अनोळखी व्यक्ती ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची तक्रार या कंपनीने डायघर पोलिसांकडे केली होती. दिवा, साबेगाव येथे दूध डेअरीचा व्यवसाय करणारे ग्राहक कैलासचंद्र कुमावत यांच्याकडे चौकशी केली. कुमावत यांच्याकडे एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून दूध डेअरीचे ६८ हजारांचे थकीत बिल सेटलमेंट करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून ३४ हजारांची रक्कम घेतली. तसेच बिलासोबत बँक ऑफ बडोदाचा ६८ हजार ४० रुपयांचा धनादेश घेतला. त्यानंतरच्या बिलामध्ये त्यांची बिलाची रक्कम कमी न होता, वाढीव बिल आले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुमावत यांनी डायघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे यांच्या पथकाने अनोळखी आरोपीबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना टोरंट पॉवर कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रफिक आणि अब्दुल्ला या दोघांनाही ८ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक केली. त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
*हे आरोपी सर्वसामान्य वीजग्राहकांची थकीत बिलाची स्वत:हून माहिती काढून त्यांचे मोबाइल क्रमांक हस्तगत करतात. त्यांच्याशी संपर्क साधून ते टोरंटो कंपनीत कामाला असल्याचे भासवून बिलाची सेटलमेंट करून देण्याचे आमिष दाखवितात. त्याचआधारे फसवणूक करतात.