कामातील दिरंगाई करणा-या ठेकेदारास २० लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:11 AM2017-08-06T04:11:11+5:302017-08-06T04:11:15+5:30
कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयासाठी मंजूर झालेला सोलर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण न करता दिरंगाई केली. यामुळे ठाणे महापालिकेने शारदा इन्व्हेन्शन या ठेकेदार कंपनीला
- सुरेश लोखंडे
ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयासाठी मंजूर झालेला सोलर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण न करता दिरंगाई केली. यामुळे ठाणे महापालिकेने शारदा इन्व्हेन्शन या ठेकेदार कंपनीला नुकताच २० लाखांचा दंड ठोठावला आहे. यामुळे कामचुकार ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.
सततच्या वाढत्या वीजबिलाच्या रकमेतून मुक्त होण्यासाठी ठाणे मनपाने शिवाजी रुग्णालयासाठी सोलर ऊर्जा प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाचा सुमारे तीन कोटी ९९ लाख ६० हजार रुपये खर्चाचा ठेका शारदा इन्व्हेन्शन कंपनीला दिला आहे. १३ फेब्रुवारी २००९ ला देण्यात आलेले हे काम सुमारे सहा महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित होते. तसा करारही झालेला आहे. परंतु, हा सोलर प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहे. तो वेळेत पूर्ण न केल्यामुळे संबंधित कंपनीला प्रतिदिन १० हजार रुपये दंड भरण्याची कारवाई झाली आहे.
सोलर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे गांभीर्य लक्षात न घेता ठेकेदार कंपनीने निष्काळजी केली. या प्रकल्पासाठी आणलेले महागडे साहित्य, यांत्रिक साहित्य, मशिनरी गंज खात असून सडत आहे. ठाणे महापालिकेनेदेखील त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते संजीव दत्त यांनी माहितीचा अधिकार टाकून ठाणे मनपाचे लक्ष वेधले. याशिवाय, करारानुसार कंपनीवर दंड आकारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. तब्बल २० लाख रुपये दंड ठोठावण्याची कारवाई महापालिकेला करावी लागली आहे. कराराप्रमाणे मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे प्रतिदिन १० हजार रुपये दंड आकारण्यात आला.सुमारे १९६० दिवस विलंब झाल्याची बाब दत्त यांनी निदर्शनात आणून दिल्यानंतर संबंधित कंपनीवर सुमारे २० लाखाचा दंड भरण्याची कारवाई केली आहे.
ठाणेकरांच्या पैशांतून उभा करण्यात येत असलेला हा ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यामुळे कंपनीवर त्वरित कारवाई करावी. रेंगाळलेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दत्त यांनी २०१२ पासून महापालिकेकडे तगादा लावला.
त्यास दाद न देता कंपनीची पाठराखण करणाºया महापालिकेला अखेर कर्तव्याची जाणीव करून देऊन कंपनीकडून २० लाखांचा दंड वसूल करण्यास भाग पाडण्यात आले.
संबंधित कंपनीच्या इसारा रक्कम, सुरक्षा अनामत आणि बँक गॅरंटी आदींच्या २४ लाख ४८ हजार ९०० रुपयांतून दंड २० लाख रुपये वसूल केल्याचे ठाणे मनपाचे कार्यकारी अभियंता विनोद गुप्ता यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे वेळेत काम न करणाºयांचे धाबे दणाणले आहे.