मृत तरुणाच्या आईला २० लाख देत सेटलमेंट; मुरबाड येथे उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 08:27 AM2023-08-11T08:27:46+5:302023-08-11T08:28:06+5:30
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : तालुक्यातील सरळगावातील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये समीर बांगर (वय ३०, रा. खरीड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतप्त नातेवाइकांनी डॉ. रविशंकर पाल यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी मृताच्या आईला २० लाख रुपयांची भरपाई देऊन तडजोड केल्याचे समोर आले.
खरीड गावातील समीर बांगर याच्या मानेला गाठ आली होती. तो सरळगाव येथील डॉ. रविशंकर पाल यांच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता. गाठीचे रात्री ऑपरेशन करीत असताना रक्तस्राव होऊ लागला. यामध्ये समीर बेशुद्ध पडला. परंतु, त्याची कोणत्याही प्रकारे हालचाल होत नसल्याने डॉ. पाल यांनी त्याला पुढील उपचारासाठी मुरबाडमधील राॅयल हॉस्पिटलमध्ये पाठविले. मात्र, तेथील डॉक्टरांनी समीर मृत असल्याचे सांगितले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, नातेवाइकांमध्ये झालेला उद्रेक पाहता डॉ. रविशंकर सिंग यांनी मृताच्या आईला २० लाखांची भरपाई दिली असली, तरी हे प्रकरण गुलदस्त्यात असल्याने आरोग्य यंत्रणेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी चर्चा करण्यात येत आहे.
घटनेची या कार्यालयात कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध झाली नाही. त्याची तालुका स्तरावरून माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल.
- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे