लोकसंख्येच्या वेगाने ठाण्यात वाहनेही ‘सुसाट’, लोकसंख्या २२ लाख, तर वाहने २० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 03:27 AM2018-12-23T03:27:27+5:302018-12-23T03:28:36+5:30

एकीकडे ठाणे शहरात यंदा हवेच्या प्रदूषणात घट झाल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण विभागाने केला आहे. परंतु, दुसरीकडे ठाण्यावर वाहनांचा भार हा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे.

20 lakhs of vehicles in Thane | लोकसंख्येच्या वेगाने ठाण्यात वाहनेही ‘सुसाट’, लोकसंख्या २२ लाख, तर वाहने २० लाख

लोकसंख्येच्या वेगाने ठाण्यात वाहनेही ‘सुसाट’, लोकसंख्या २२ लाख, तर वाहने २० लाख

googlenewsNext

ठाणे : एकीकडे ठाणे शहरात यंदा हवेच्या प्रदूषणात घट झाल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण विभागाने केला आहे. परंतु, दुसरीकडे ठाण्यावर वाहनांचा भार हा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे. आज शहराची लोकसंख्या ही २२ लाखांच्या घरात गेली आहे. तर, २० लाख ४५ हजार १२३ वाहने रस्त्यावर धावत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये दुचाकींची संख्या ही सर्वाधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यावरून ठाणे शहरात दरतासाला तब्बल १२ वाहने खरेदी केली जात असल्याचे उघड झाले आहे.
महापालिकेच्या प्रदूषण विभागाने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालातून या बाबी समोर आल्या आहेत. ठाण्यातील मुख्य रस्ते हे मोठे आहेत. परंतु, त्यांच्यावर मेट्रो आणि इतर कामे सुरू झाल्याने त्या ठिकाणी कोंडी होऊ लागली असून ती फोडण्यासाठी शहराच्या विविध भागांत उड्डाणपूल उभारले आहेत. घोडबंदरपट्ट्यात तर चारचार पदरी रस्ते असतानाही या मार्गावर आजही कोंडी होत आहे. अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत बोलायचेच झाले तर स्टेशन परिसर, जांभळीनाका, कोर्टनाका, गोखले रोड, नौपाडा, मल्हार, सिव्हील रुग्णालयासह इतर रस्त्यांवर तर वाहनचालकांची वाहन कसरत सुरू असते. प्रदूषण विभागाने दिलेल्या अहवालानुसार दरवर्षी वाहनांच्या संख्येत ८ ते १० टकक्यांची वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात शहराच्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या आल्यास आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नसेल. २०१६-१७ या वर्षात वाहनांची संख्या १९ लाख २७ हजार १५५ एवढी होती. यंदा मात्र त्यात वाढ झाली आहे.
तर, २०१८-१९ या वर्षात शहरातील वाहनांची संख्या ही २० लाख ४५ हजार १२३ एवढी असून त्यामध्ये दुचाकींची संख्या ही सर्वाधिक आहे. ज्यामध्ये दुचाकींची संख्या ही १०,७६,५६४ एवढी आहे. तर ४,१४,२८४ एवढी कारची संख्या असून ४५,४१४ जीपसंख्या आहे. याशिवाय, १,०६,४८७ रिक्षा या ठाणे शहरात धावत असून ३७,४६१ टुरुस्टी कॅब, १२५९ स्कूलबस, ४७२ टीएमटी बस, ७७,५०४ ट्रक, ८,९३४ ट्रेलर, ११,६४० टँकर आणि १७५१ अ‍ॅम्ब्युलन्स रस्त्यावर धावत आहेत. ठाणे शहराच्या लोकसंख्येच्या आसपास आता वाहनांची संख्या आहे. तर, वाहतूक विभागाच्या माहितीनुसार एका वर्षापूर्वी ठाणे शहरात एका नागरिकामागे वाहनांची संख्या ही दोन होती. परंतु, ती संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी आणखी कठीण होणार आहे.

Web Title: 20 lakhs of vehicles in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.