बैलांच्या झुंजीचे आयोजन करणा-यांसह २० जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 10:15 PM2017-12-03T22:15:22+5:302017-12-03T22:15:58+5:30
भिवंडी : बैलाच्या झुंजीचे आयोजन करण्यास बंदी असताना तालुक्यातील सोनाळे गावाच्या नदीकिनारी बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्याने तालुका पोलीस ठाण्यात आयोजकांसह १५ ते २० जणांविरोधात प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यात प्रथमच बैलांच्या झुंजी लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने गावक-यांमध्ये संतप्त वातावरण आहे. बैलांच्या झुंजींना बंदी असताना तालुक्यातील सोनाळे गावाजवळील नदी किना-यावरील मोकळ्या जागेत बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांना मिळताच त्यांनी साध्या वेषांत घटनास्थळी जाऊन मोबाईलमध्ये या झुंजीचे चित्रीकरण केले. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा ताफा आल्याचे पाहून आयोजकांसह झुंजी लावणा-यांनी पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून झुंजीसाठी आणलेल्या दोन बैलांसह जीप व टेम्पोे असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आयोजक दीपक किसन पाटील आणि छोट्या सुक-या पाटील यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच जप्त केलेले दोन बैल पोलिसांनी आनगाव येथील गोशाळेत जमा केले. पोलीस आयोजक व वाहनमालकाच्या मागावर असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई करणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.