भाज्या २० टक्के महागल्या, शेतकरी संपाचा परिणाम, आवक १५ टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:10 AM2018-06-03T02:10:19+5:302018-06-03T02:10:19+5:30
राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत.
ठाणे : राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी भाज्या, फळे यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. अगोदरच इंधनदरवाढीमुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय यांचे कंबरडे मोडले असताना आता रोजच्या जेवणातील भाजीपाला महागण्यास सुरुवात झाली आहे.
ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी आवश्यक ताजा भाजीपाला, फळे, अन्नधान्य, दूध वेळेत पोहोचावे, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याकरिता पोलिसांबरोबरच अन्य संबंधित अधिकाºयांच्या बैठका घेतल्या जात आहेत, असे ठाणे जिल्हा उपनिबंधक एस.एम. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले असून दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला जात आहे. त्यांचा हा संप सुमारे १० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यातच, पाऊस सुरू झाला, तर शेतातील भाजीपाला खराब होऊन टंचाईचे संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संपाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाज्यांचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे बाजारात गेल्यावर अर्धा ते एक किलो भाजी खरेदी करणारा ग्राहक कमी प्रमाणात भाजी खरेदी करत आहे, तर हॉटेल व्यावसायिक भविष्यात संप चिघळल्यास भाज्यांचे दर वाढतील, या भीतीपोटी अतिरिक्त भाजीपाला खरेदी करत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे.
इंधनांचे दर सामान्यांना महागाईचे चटके देत असताना शेतकरी संपामुळे रोजच्या जेवणाचेही गोरगरिबांचे वांदे होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेले भाजपाचे नेते या भडकलेल्या महागाईबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. मात्र, महिलांकडून या महागाईविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान भाजीपाला,फळे, अन्नधान्य, दूधपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी पोलीस व संबंधित मार्केट कमिट्यांच्या बैठका सुरू आहेत. वाशी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, उल्हासनगर आदी ठिकाणच्या शेतमालपुरवठ्याची आवक १५ टक्के कमी झाली आहे.
ठाणे शहरात भाज्यांचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. संपाचा नेमका परिणाम सोमवारी जाणवू शकतो, असे भाजीविक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.
शेतकरी संपाचा कल्याणच्या एपीएमसीलाही फटका
राज्यातील शेतकरी शुक्रवारपासून संपावर गेल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) शनिवारी केवळ ९८ ट्रक मालाची आवक झाली. त्यामुळे समितीला ६० हजार रुपयांचा फटका बसला.
वाशी येथील बाजार समितीपाठोपाठ कल्याण एपीएमसी मोठी समिती आहे. येथे दिवसाला १५० पेक्षा जास्त ट्रक माल येतो. शुक्रवारी पहिल्या दिवशी संपाचा फारसा फटका बसला नाही.
मात्र नाशिक, जुन्नर, नगर, आळेफाटा येथून ७८ तर परराज्यातून २२ ट्रक आले. त्यात भाजीपाल्याचे १८ ट्रक व ३० टेम्पो होते. पालेभाज्यांचे पाच टेम्पो आले. अन्नधान्याचे १२ ट्रक, फुलांचे नऊ टेम्पो, फळांचे दोन ट्रक व सात टेम्पो माल आला.
एकूण चार हजार ६३० क्विंटल मालाची आवक झाली. ही आवक निम्म्याहून कमी आहे. परिणामी, भाज्यांचे भाव प्रतिकिलो साधारण तीन ते आठ रुपयांपर्यंत वाढले. मिरची आणि टोमॅटोचे भाव आठ रुपयांनी वाढले होते.