२० टक्के घट ही ठाण्यातील ‘अंदर की बात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:17 AM2019-08-25T00:17:18+5:302019-08-25T00:17:23+5:30
ब्रॅण्डेड अंतर्वस्त्रांच्या मागणीत झाली घट
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात स्त्री-पुरुषांच्या ब्रॅण्डेड अंतर्वस्त्रांच्या मागणीत तब्बल २० टक्के घट झाल्याची कबुली विक्रेते व होलसेलर यांनी दिली. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बोर्डाचे माजी अध्यक्ष एलन ग्रीनस्पेन यांनी अलीकडेच असे नमूद केले होते की, अंतर्वस्त्रांच्या मागणीत ४९ वर्षांनंतर झालेली घट हा आर्थिक मंदीचा स्पष्ट इशारा आहे.
ठाण्यातील अंतर्वस्त्रांचे विक्रेते मुकेश गाला यांनी सांगितले की, दररोज खरेदी करण्याकरिता येणाऱ्या ग्राहकांची घटलेली संख्या जाणवणारी आहे. ही घट किमान २० टक्के निश्चित आहे. पावसाळ्यात अन्य कपड्यांची खरेदी घटली, तरी अंतर्वस्त्रांची खरेदी घटत नाही. मात्र, यंदा ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करायला ग्राहक आला नाही. हटकून ब्रॅण्डेड अंतर्वस्त्रांचा आग्रह धरणारे पाचपैकी दोन ग्राहक कमी झाले आहेत, असेही गाला म्हणाले.
कल्याण-डोंबिवली या शहरांतील अंतर्वस्त्रांच्या विक्रेत्यांनी मात्र खरेदीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे मत व्यक्त केले. खपात वाढही झालेली नाही, हे त्यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवलीत ब्रॅण्डेड अंतर्वस्त्रांचा वापर करणाऱ्यांची संख्या तशीही मर्यादित आहे. अनेक ग्राहक हे फेरीवाल्यांकडून अशा कपड्यांची खरेदी करतात. स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांच्या डोंबिवलीतील विक्रेत्याने मात्र खप घटल्याचे मान्य केले. सणासुदीच्या व लग्नसराईच्या काळात अन्य कपड्यांबरोबरच अंतर्वस्त्रांचा खप वाढेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
उल्हासनगरातील मॉस्को या ब्रॅण्डेड कपड्यांच्या दुकानाचे मालक पुरुषोत्तम खिलनानी यांनी सहा महिन्यांपासून अंतर्वस्त्रांची मागणी कमी झाल्याची कबुली दिली. नोकरकपातीमुळे मध्यमवर्गीयांमधील बेरोजगारी वाढल्याचा हा परिणाम असल्याचे ते म्हणाले.
शहर यूटीए व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक छतवाणी म्हणाले की, ब्रॅण्डेड कपड्यांच्या व प्रामुख्याने अंतर्वस्त्रांच्या विक्रीवर गेल्या काही महिन्यांत मोठा परिणाम झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे लोकांचे प्राधान्यक्रम बदलले असून अंतर्वस्त्रांच्या वापरात तडजोड करणे, हाच पर्याय ग्राहक स्वीकारत आहे.
एका ग्राहकाने सांगितले की, ब्रॅण्डेड अंतर्वस्त्रांचा वापर बंद केल्याने आर्थिक संकटात मोठा दिलासा मिळत नसला, तरी अनेक उपायांपैकी तो आहे.