अंबरनाथमध्ये वीस हजार झाडे आगीच्या भक्षस्थानी, समाजकंटकांनी जाळली झाडं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:13 AM2017-12-21T03:13:53+5:302017-12-21T03:14:07+5:30
राज्य सरकारतर्फे वसुंधरा दिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावानजीकच्या वनखात्याच्या जमिनीवर लावलेल्या एक लाख झाडांपैकी २० हजार झाडे समाजकंटकांनी जाळल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. पालकमंत्री व खासदारांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी होणार आहे.
कल्याण : राज्य सरकारतर्फे वसुंधरा दिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावानजीकच्या वनखात्याच्या जमिनीवर लावलेल्या एक लाख झाडांपैकी २० हजार झाडे समाजकंटकांनी जाळल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. पालकमंत्री व खासदारांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी होणार आहे.
एक लाखापैकी ९५ टक्के झाडे जगली होती. यंदाच्या वर्षी पाऊसही चांगला झाला तसेच थंडीही चांगली आहे. त्यामुळे झाडांच्या वाढीस पोषक वातावरण मिळाले होते. या झाडांमुळे मांगरूळ टेकडी परिसरात वनराई फुलवण्याची योजना होती.
अंबरनाथ ग्रामीण भागात जमिनी बळकावण्याच्या प्रयत्नातून ही आग लावली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वनविभागाचे अधिकारी व खासदार डॉ. शिंदे यांनी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात संयुक्त तक्रार दिली आहे. समाजकंटकांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने अंबरनाथ-शीळ रस्त्यालगत लावलेली झाडे काही दिवसांपूर्वी समाजकंटकांनी तोडली. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटकही केली.