फ्लिपकार्ट कंपनीच्या ठेकेदाराने २० कामगारांना कामा वरून काढले, कामगारांनी केली निदर्शने
By नितीन पंडित | Published: April 11, 2023 07:13 PM2023-04-11T19:13:30+5:302023-04-11T19:13:40+5:30
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या फ्लिपकार्ट या कंपनीस सेवा देणाऱ्या इंस्टाकार्ट सर्विसेस प्रा.ली.च्या व्यवस्थापनाने कंपनीत काम करणाऱ्या स्थानिक ...
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या फ्लिपकार्ट या कंपनीस सेवा देणाऱ्या इंस्टाकार्ट सर्विसेस प्रा.ली.च्या व्यवस्थापनाने कंपनीत काम करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याने त्या विरोधात महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे सरचिटणीस राजू मढवी यांच्या नेतृत्वाखाली कंपनी प्रशासनाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी निदर्शने करण्यात आली.
फ्लिपकार्ट कंपनीचे पडघा नजिक वाशेरे येथे गोदाम असून त्या ठिकाणी इंस्टाकार्ट सर्विसेस प्रा.ली.ही कंपनी काम पाहते.या ठिकाणी स्थानिक २० भूमिपुत्र मागील अडीच वर्षांपासून माथाडी वाराईचे काम करीत असताना मागील दहा दिवसांपूर्वी या सर्व स्थानिक कामगारांना कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकण्यात आले. तेव्हापासून स्थानिक कामगार महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियनच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत.
परंतु व्यवस्थापन दाद देत नसल्याने मंगळवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगारांना युनियन पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.या घटनेची पोलिसांना त्यानंतर माहिती मिळताच पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे व पोलिस पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी रीतसर कंपनी प्रशासनाची वेळ घेवून चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
स्थानिक भूमिपुत्र या कंपनीत मागील अडीच वर्षां पासून काम करीत असताना कंपनीने त्यांना कामा वरून काढून टाकत मुंबई येथील ठेकेदारास काम सोपविले असून कंपनीचे हे धोरण चुकीचे व येथील स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करणारे आहे.त्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करून या कंपनीने आंदोलनाची दखल घेतली नाही तर याहून अधिक उग्र आंदोलन करून येथील काम बंद पाडू असा इशारा राजू मढवी यांनी दिला आहे.