लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सश्रम कारावास
By जितेंद्र कालेकर | Published: July 1, 2024 10:02 PM2024-07-01T22:02:55+5:302024-07-01T22:03:16+5:30
ठाणे न्यायालयाचा आदेश : कळव्यातील पाच वर्षांपूर्वीची घटना
ठाणे : एका १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नरेश ऊर्फ दादू अशोक विखे (२२) आणि विजय बाबासाहेब तांबे (२२) या दोघांना २० वर्षे सश्रम कारावासाची आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली आहे. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षाही आरोपींना भोगावी लागणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सोमवारी दिली.
पीडित अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देत आरोपी नरेश याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यातील दुसरा आरोपी विजय यानेही तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये कळवा पोलिसांनी दोघांना अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी ठाणे जिल्हा विशेष पोस्को न्यायालयाचे न्यायाधीश आर. यू. मालवणकर यांच्यासमोर २९ जून रोजी झाली.
विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी यातील आठ साक्षीदार तपासून पुरावे सादर करीत आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. पुरावे आणि साक्ष सादर केले. त्या पुराव्यांसह साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून दोघांनाही न्यायालयाने दोषी ठरविले. याप्रकरणी दोघांना प्रत्येकी २० वर्षे सश्रम कारावासाची आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.