भातसा धरणाच्या मजबूतीकरणासाठी २०० कोटींचा निधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 05:35 PM2021-04-05T17:35:00+5:302021-04-05T17:35:25+5:30

Bhatsa Dam : भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती थांबणार असून पुढील काळात धरणाची गळती पुर्णत रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार आहे, असा दावा अभियंत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

200 crore fund for strengthening of Bhatsa Dam | भातसा धरणाच्या मजबूतीकरणासाठी २०० कोटींचा निधी 

भातसा धरणाच्या मजबूतीकरणासाठी २०० कोटींचा निधी 

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने भातसा धरणास हा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात येत आहे.

- रविंद्र सोनावळे

शेणवा : मुंबई व ठाणे महानगरांना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या मजबूतीकरणासाठी व धरणक्षेत्रातील अन्य अवश्य असलेल्या विकास कामांसाठी राज्य सरकारने २०० कोटी ६६ लाख रुपयांचा भरीव असा निधी मंजूर केला आहे. भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती थांबणार असून पुढील काळात धरणाची गळती पुर्णत रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार आहे असा दावा अभियंत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने भातसा धरणास हा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील महत्वाच्या धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने निविदा प्रक्रीयेस मान्यता दिली आहे. यांत मुंबई व ठाणे या प्रमुख शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या कामांचा देखील समावेश असून धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-२ व ३ या धरण प्रकल्पातील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. 

सरकारच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिलेल्या या निधीपैकी पहिल्या टप्यात भातसा धरणासाठी ११४ कोटी रुपयांची कामे हाती घेतली जाणार असून विशेष म्हणजे ही कामे अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केली जाणार आहेत.यामध्ये भातसा धरणाच्या उर्ध्व व अधो बाजूकडील (रँकिंग) सांधे भरणे, या महत्वपूर्ण कामाचा समावेश आहे. या कामांमुळे धरणाची गळती रोखण्यास मदत होईल.

धरणावरील मॅकनिकल उपकरणाची तसेच धरण मुख्य गेट, अंतर्गत लिफ्ट या (यंत्रसामग्रीची)डागडुजी करणे ,व धरणावरील विद्युत प्रणालीचे देखभाल व दुरुस्तीकरण करणे, धरण माथ्यावर जाणारे पोचरस्ते तयार करणे,प्रामुख्याने अशी महत्वाची कामे या मंजूर निधीतून केली जाणार आहेत अशी माहिती भातसा धरणाचे सहाय्यक अभियंता श्याम हंबीर, व गणेश कचरे  यांनी बोलताना दिली.  

धरण परिसरातील अन्य कामांसाठी दुसऱ्या टप्यात ८६ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीत उर्वरीत प्रस्तावित व आवश्यक कामे हाती घेतली जाणार आहेत असे भातसा धरणाच्या सहाय्यक अभियंत्यांनकडून सांगण्यात येत आहे. धरणांच्या सुरक्षिततेमध्ये सुधारणा करताना त्यांचे बळकटीकरण, व्यवस्थापन करणे, धरणांचे परिचालन व देखभाल यामध्ये सातत्य राखणे हा महत्वाचा उद्देश जलसंपदा विभागाचा आहे असे सांगितले जात आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करण्याची भातसावर महत्वाची जबाबदारी आहे.प्रतिदीन २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई व ठाणे महानगराला दिले जाते या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९  मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्ष घनमीटर आहे. तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चोरस किलोमिटर आहे. भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालवा ६७ किलोमिटर मधून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. तर डावा कालव्याचे काम अपूर्ण आहे.भातसा धरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राव्दारे १५ मेगावॅट एवढी विजनिर्मिती केली जाते .

भातसा धरणाची गळती रोखण्याचे प्रयत्न 
यापूर्वी भातसा धरणाच्या मुख्य धरण बांधातून छिद्रांद्वारे पाण्याची होणारी गळती रोखण्यासाठी मोजणी क्रमांक १ डी ते मो. क्र. ११ व मो. क्र. १२ अ ते मो. क्र. २५ ब तसेच तपासणी गॅलरी आणि उच्चस्तर गॅलरी मधील छिद्रांचे ड्रिलींग व सिमेंट ग्राऊटींगचे कामे करण्यात आली यासाठी जलसंपदा विभागाने २६ कोटी रुपये खर्च करुन धरणाची गळती काही अंशी थांबविण्यासाठीचे प्रयत्न केले गेले आहेत. 

या ग्राऊटींगच्या कामामुळे ९८ हजार प्रतिमिनीट असणारी गळती ६० हजार प्रतीमिटर इतकी कमी झाली आहे.असे सांगितले जाते परंतु अद्यापही धरणातून पाण्याची गळती सूरु असल्याने ही गळती थांबविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन धरणाच्या मजबूतीकरणाची कामे अत्यावश्यक आहेत, असे भातसा धरणाच्या जलसंपदा विभागातील अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: 200 crore fund for strengthening of Bhatsa Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.