६०० किलो ओल्या कचऱ्यापासून सहा वर्षांत बनवले २०० किलो जैवखत

By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 8, 2024 11:22 AM2024-02-08T11:22:17+5:302024-02-08T11:22:44+5:30

घराबाहेर गेला नाही कचऱ्याचा एकही कण, तरुणाचे व्यवस्थापन

200 kg of bio-fertilizer made from 600 kg of wet waste in six years | ६०० किलो ओल्या कचऱ्यापासून सहा वर्षांत बनवले २०० किलो जैवखत

६०० किलो ओल्या कचऱ्यापासून सहा वर्षांत बनवले २०० किलो जैवखत

प्रज्ञा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या ६ वर्षांत ठाण्यातील वालावलकर कुटुंबाने घरच्या घरी कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यांच्या घरातून कणभरही कचरा बाहेर टाकलेला नाही. ते ओल्या (जैवविघटनशील) कचऱ्याचे घरातच जैवखतात रूपांतर करत असून, सहा वर्षांत जवळपास ६०० किलो ओल्या कचऱ्यापासून जवळपास २०० किलो जैवखत तयार केले. सगळा सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठवतात. पर्यावरणशास्त्रात पदव्युत्तर पदवीधारक प्रतीक वालावलकर या तरुणाने याकरिता पुढाकार घेतला. 

वालावलकर यांच्या घरगुती सेंद्रिय कचरा व्यवस्थापन प्रकल्पात सहा वर्षात अर्ध्या टनापेक्षा अधिक सेंद्रिय कचरा त्यांच्या घराबाहेर जाण्यापासून रोखला आहे. घरात दररोज तयार होणारा सेंद्रिय कचरा बारीक चिरून तो बादलीत नीट पसरवून ढवळला जातो. त्याला अवघी दहा ते पंधरा मिनिटे लागतात, असे प्रतीकने सांगितले. या विघटन प्रक्रियेतून घरातील झाडांच्या वाढीकरिता आणि मातीची सुपीकता, तिचा पोत वाढवण्याकरिता आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांनीयुक्त सेंद्रिय खताची निर्मिती होते. सेंद्रिय कचऱ्याच्या विघटन प्रक्रियेतून निघणाऱ्या पाण्यात सेंद्रिय खतातील पोषक घटक मिसळलेले असल्यामुळे सेंद्रिय खताप्रमाणेच ते पाणी सुद्धा आपण घरातील झाडांच्या मातीत टाकू शकतो.   
ऑगस्ट २०१३ मध्ये प्रतीकने त्याच्या गृहसंकुलात निर्माल्य आणि भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून जैवखत निर्मितीचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला. त्यानंतर गृहसंकुलातील झाडांच्या पालापाचोळ्यापासून गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला, ज्यातून जवळपास ८०० किलोग्रॅम दर्जेदार अशा गांडूळखताची निर्मिती झाली होती.

जैवखत उत्कृष्ट प्रतीचे 
उत्कृष्ट प्रतीचे जैवखत नजरेने, गंधाने आणि स्पर्शाने ओळखण्याच्या काही खुणा आहेत; त्याचा रंग काळा असतो, त्याला मातीचा वास असतो, वजनाने ते मातीपेक्षा हलके असते, त्यात मुबलक प्रमाणात ओलावा असतो. या सगळ्या खुणा आमच्या जैवखताशी अगदी तंतोतंत जुळतात. स्वयंपाकघरात रोज उत्पन्न होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचे आणि देवघरातील निर्माल्याचे घरगुती पातळीवरच दुर्गंधी विरहीत शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होत राहते. 

Web Title: 200 kg of bio-fertilizer made from 600 kg of wet waste in six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.