अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांच्या २०० गाड्या तोडल्या; भाईंदर पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 03:03 AM2020-12-03T03:03:06+5:302020-12-03T03:03:27+5:30
मीरा-भाईंदरमध्ये रस्ते-पदपथ बळकावणारे फेरीवाले आणि हातगाड्यामाफियांचा धुमाकूळ सुरू आहे
मीरा राेड : कोरोनाच्या संसर्गामुळे निर्बंध असताना मीरा- भाईंदरमध्ये रस्ते-पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत असून कोरोना संसर्गाच्या नियमांचेसुद्धा उल्लंघन केले जात आहे. मीरा रोडच्या नयानगर भागातील नवीन सिमेंटचा रस्ता बळकावणाऱ्या फेरीवाल्यांच्या २०० हातगाड्या जेसीबीने तोडून टाकण्याची कारवाई बुधवारी महापालिकेने केली.
मीरा-भाईंदरमध्ये रस्ते-पदपथ बळकावणारे फेरीवाले आणि हातगाड्यामाफियांचा धुमाकूळ सुरू आहे. बाजारवसुली करणारे ठेकेदार यांचे राजकीय व प्रशासकीय लागेबांधे पाहता ठेकेदार मनमानी बाजारशुल्क वसूल करतात. शिवाय, नवनवे फेरीवाले आणून बसवले जातात. यामध्ये काही नगरसेवक, राजकारण्यांपासून पालिका अधिकारी यांचे अर्थपूर्ण साटेलोटे असल्याने फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली जात नाही, असा आरोप केला जात आहे. उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून १५० मीटर तर शाळा, कॉलेज, रुग्णालय, धार्मिकस्थळांपासून १०० मीटरच्या आवारात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असतानाही सर्रास फेरीवाले अतिक्रमण करतात.
पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून नव्याने बनवलेल्या सिमेंट रस्त्यांवरसुद्धा फेरीवाले आणि त्यांच्या हातगाड्यांचा विळखा पडलेला आहे. नयानगर भागात नव्याने बांधलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर फेरीवाले कब्जा करून भरमसाट हातगाड्या लावत आहेत. वाहतुकीची कोंडी होत असल्याने फेरीवाल्यांस गाडी बाजूला घे सांगितले तरी ते दादागिरी करतात. रस्त्यांवर फेरीवाल्यांचा कब्जा, त्यातच मास्क न घालणे व होणारी गर्दी पाहता कारवाईची मागणी जागरूक नागरिकांकडून होत होती.
प्रभाग अधिकारी कारवाई करत नसल्याने आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी शहरातील रस्ते-पदपथांवरील फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण, रहदारीला होणारा अडथळा व वाहतूककोंडी आदींच्या अनुषंगाने कारवाईचे आदेश दिले होते. बुधवारी उपायुक्त अजित मुठे यांच्यासह सर्व प्रभाग अधिकारी, कर्मचारी, पोलीस व बाउन्सर आदींच्या उपस्थितीत पालिकेने सुमारे २०० हातगाड्या जेसीबीने तोडून टाकल्या.