कल्याण-डोंबिवलीत २० हजार बेड सज्ज हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:41 AM2021-04-20T04:41:40+5:302021-04-20T04:41:40+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रोज १६ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसाला एक हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रोज १६ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसाला एक हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. महापालिका हद्दीत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता आहे. किमान २० हजार बेडची व्यवस्था महापालिका प्रशासनाकडून केली जावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेही लक्ष वेधले आहे.
महापालिकेची सहा कोविड रुग्णालये आहेत. तसेच ६८ खासगी कोविड रुग्णालये आहेत. या दोन्ही रुग्णांची बेड क्षमता एकूण साडेचार हजारांच्या घरात आहे. उपलब्ध बेड संख्या आणि बेडची मागणी यांचे प्रमाण व्यस्त स्वरूपात आहे. राज्यात संचारबंदी लागू असताना अनेक तरुण मोकाट फिरताना दिसून येत आहेत. रुग्ण वाढत असताना कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्यास कठोर कारवाई व्हावी. त्याचबरोबर बेडची संख्या वाढविण्यात यावी, तरच रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होईल. याकडे मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
चौकट
‘नियमांची अंमलबजावणी करा’
नागरिकांकडून काेराेनाचे पालन केले जाते की नाही यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. मात्र, हे अधिकारी कोरोनाकाळात बेकायदा बांधकाम विरोधातील कारवाईत गुंतलेले आहेत. त्यांनी कोरोना नियमावलीच्या कठाेर अंमलबजावणीकडेही लक्ष देणे अपेक्षित आहे, याकडेही माजी नगरसेवक म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.
--------------